गाळमुक्त धरण योजनेला दिरंगाईचा फटका!

By admin | Published: June 26, 2017 09:41 AM2017-06-26T09:41:29+5:302017-06-26T09:41:29+5:30

उद्दिष्टपूर्ती नाही; केवळ २१ तलावांमध्येच काम सुरू; अकोला जिल्ह्यातील स्थिती.

Free of cost of the sedition free of cost! | गाळमुक्त धरण योजनेला दिरंगाईचा फटका!

गाळमुक्त धरण योजनेला दिरंगाईचा फटका!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ५० गाव तलाव आणि २० पाझर तलावांतील गाळ काढण्यात येणार होता, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी कामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी ६ मे रोजी जिल्हा परिषद व जलसंधारण (लघुसिंचन) विभागाला दिले होते; मात्र वळिवाचा पाऊस अन् प्रशासकीय दप्तर दिरंगाईमुळे गाळमुक्त धरण योजनेला फटका बसला आहे. जिल्हाभरातील केवळ २१ तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र तीसुद्धा आता पावसामुळे खंडित झाली आहे.
जिल्ह्यात पाझर तलाव आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागामार्फत गाळ काढण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामांचे नियोजन करून कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे दिले. त्यानुसार संबंधित यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील गाव तलाव व पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांच्या नियोजनातच अधिक वेळ गेल्याने ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील ११ तलावांची निवड झाली होती. प्रत्यक्षात आठ तलावांमध्ये काम सुरू केले. बाळापुरात आठपैकी केवळ तीन, पातूर तालुक्यात १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेले जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे सिंचन तलाव सहा, पाझर तलाव नऊ, गाव तलाव १५ आहेत. यांपैकी सिंचन तलाव चार, पाझर तलाव सात, गाव तलाव ११ यातील गाळ काढणे आवश्यक होते. प्रत्यक्षात केवळ दोन कामे सुरू झालीत, अकोटमध्ये सातपैकी तीन, तेल्हारामध्ये चारपैकी दोन, बार्शीटाकळीमध्ये ११ पैकी तीन तलावांतील काम सुरू झाले.
लोकसहभागही नाही
शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत जिल्ह्यात तलावातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय बैठका घेऊन, शेतकऱ्यांना गाळ शेतात नेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना प्रशासनला होत्या, तसेच गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून करावयाची असून, गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्डच्या डीझलचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे, असेही निर्देश होते. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण जिल्हाभरातून केवळ १२४ शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, प्रशासकीय दिरंगाईचा फटका अनेक गावांना बसला. त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील देवळी हे गावसुद्धा आहे. येथील ग्रामस्थांनी सुकळी येथील तलावामधून गाळ काढण्यासाठी कार्यकारी अभियंता जलसंधारण यांच्याकडे परवानगी मागितली होती; मात्र त्यांचा अर्ज तब्बल पंधरा दिवस प्रतीक्षेत ठेवत अखेर परवानगी नाकारण्यात आली.

Web Title: Free of cost of the sedition free of cost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.