पिंजर परिसरात काढ्याचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:58+5:302021-04-25T04:17:58+5:30
----------------------------------------------- निहिदा परिसरात नेटवर्कची समस्या निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम निहिदा, पिंजर, साखरखेर्डा यासह अन्य गावांत टॉवर असून, नेटवर्क ...
-----------------------------------------------
निहिदा परिसरात नेटवर्कची समस्या
निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम निहिदा, पिंजर, साखरखेर्डा यासह अन्य गावांत टॉवर असून, नेटवर्क नसल्याने ग्राहकांची अडचण होते. नेटवर्कअभावी बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
--------------------------------------
बेवारस श्वानांमुळे नागरिकांना त्रास
अकोट : शहरात अनेक दिवसांपासून बेवारस श्वानांचा धुमाकूळ सुरू आहे. याचा नाहक त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक पालिका प्रशासनाला तक्रारी देण्यात आल्या. परतु, श्वानांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष होत आहे.
-------------------------------------
वृक्षांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमींत रोष
वाडेगाव : जिल्ह्यातील बऱ्याच मार्गांवर विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. परिणामी, पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. जिल्ह्यात रस्ता कामात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. नवीन झाडांचे संगोपन व्यवस्थित केले जात नाही.
-----------------------------
भरमसाट विद्युत देयकाने ग्राहक त्रस्त
आगर : सध्याच्या काळात नागरिकांसाठी विद्युत अविभाज्य अंग झाले आहे. परंतु, आगर परिसरातील अनेक शेतकऱ्यांसह नागरिकांना मीटर वाचन न करताच विद्युत देयके दिली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
------------------------------------------
मोबाईलचा अतिवापर ठरतोय धोकादायक
पातूर : नागरिकांना मोबाईल जीव की प्राण झाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हातात खेळण्याप्रमाणे स्मार्टफोन, सुपरफोन दिसतात. मोबाईलचा हा अतिवापर आजारांना जन्म देणारा ठरत आहे. कानासह डोळे व डोक्याचे आजार जडत आहेत.
---------------------------------------
शेतकरी आता पीक कर्जाच्या प्रतीक्षेत
तेल्हारा : खरीप हंगाम सुरू होण्यास अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना अजूनही बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसल्याने शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
-----------------------------------------------
विवाहावर निर्बंध, वधूपित्याची तारांबळ
चिखलगाव : कोरोनामुळे २५ जणांच्या उपस्थितीत विवाह उरकायचा आहे. त्यामुळे वधूपित्याची तारांबळ उडत आहे. केवळ दोन तासांत लग्न आटोपताना त्यांची दमछाक होते.
-------------------------------------------------
पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट
पातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे येथील पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने गर्दी न करण्याचे आवाहन केले असून, शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती संख्येत घट केली आहे.
------------------------------------
उकाड्यात विजेचा लपंडाव सुरूच
खानापूर : वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात वारंवार वीज गुल होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
-----------------------------------
बार्शीटाकळी तालुक्यात सरपणासाठी धावपळ
बार्शीटाकळी : ग्रामीण भागातील महिला सरपणासाठी धावपळ करीत आहेत. दरवर्षी अनेक महिला उन्हाळ्यात सरपण गोळा करतात. हेच सरपण पुढे वर्षभर कामी येते. उज्ज्वला गॅस योजनेनंतरही महिलांची धावपळ अजून संपली नाही.
-------------------------------------------