युवकांना पोलीस भरतीसाठी फिटनेसचे मोफत धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:44+5:302021-03-13T04:34:44+5:30
वाडेगाव : परिसरातील अनेक युवक पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. पोलीस व सैन्य भरतीत उत्तीर्ण होण्यासाठी युवकांची तयारी परिपूर्ण ...
वाडेगाव : परिसरातील अनेक युवक पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. पोलीस व सैन्य भरतीत उत्तीर्ण होण्यासाठी युवकांची तयारी परिपूर्ण असणे गरजेचे आहे. त्यामुळे युवकांना मैदानी चाचणी पूर्ण करून घेण्यासाठी माजी सैनिक दीपक सरप यांनी पुढाकार घेतला असून, ते परिसरातील युवकांना मोफत फिटनेसचे धडे देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.
वाडेगाव येथील सेवानिवृत्त माजी सैनिक दीपक सरप गावातील युवकांना सैन्य दल, पोलीस खात्यात भरती होण्यासाठी प्रेरित करीत असून, युवकांना मैदानी चाचणीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. तसेच लेखी परीक्षेची तयारीही करून घेत आहेत. ते दररोज सकाळी गावातील युवकांकडून शारीरिक कवायतीसह लेखी परीक्षेचा सराव करून घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी पीएसआय मनोज वासाडे, सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रा. पं. सदस्य सचिन धनोकार, सुनील मानकर, निखिल मानकर, विवेक मानकर, संदीप घाटोळ, राहुल मसने आदींकडून सहकार्य मिळत आहे.