अंबाबरवा अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
By admin | Published: April 30, 2016 01:45 AM2016-04-30T01:45:00+5:302016-04-30T01:45:00+5:30
अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला.
राजेश शेगोकार/ बुलडाणा
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर म्हणून पाहिले जाणार्या अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून अंबाबरवा गाव येत्या पंधरवड्यात पूर्णपणे उठविले जाणार आहे. अभयारण्यातील सर्व सहा गावे उठल्यानंतर वाघांना मध्यप्रदेशातील सिपना ते अंबाबरवा असा मोठा जंगलपट्टा मुक्त संचार करण्यासाठी मिळणार आहे.
अंबाबरवा परिसर २00३ पासून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे; मात्र तरीही अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. येथील एकूण सहा गावांचे पुनर्वसन अभिप्रेत आहे. त्यापैकी खिडकी, चुनखडी आणि अंबाबरवा या तीन गावांसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेण्यात आला आहे.
अंबाबरवा अभयारण्यातील या तीन गावांच्या ७४0 कुटुंबांचे प्रारंभी पुनर्वसन करावयाचे होते. त्यांच्या याद्यांची फेरतपासणी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात ५१७ कुटुंबे पुनर्वसन आणि मदतीसाठी पात्र ठरली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी १0 मे २0१५ रोजी अंबाबरवा अभयारण्याला अनपेक्षितपणे भेट देऊन ग्रामस्थांनी शासकीय नियमानुसार रोख रक्कम घेऊन पुनर्वसीत व्हावे, अशी भूमिका मांडली होती. यावेळी तीनही गावांमध्ये ग्रामस्थांची सभा त्यांनी घेतली होती. १४ वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात ही बैठक मोलाची ठरली होती.
गुरुवार, २८ एप्रिल रोजी अंबाबरवा गावात आकोट वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसोबत बैठक झाली. त्यानुसार १५ मेपर्यंत अंबाबरवा गावातील ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनर्वसन अंतर्गत गाव सोडण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.