कोरोना काळात मोफत शिवभोजन थाळीचा गरजूंच्या पोटाला आधार; अनुदानपोटी मिळाले एक कोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:43+5:302021-09-13T04:18:43+5:30
संतोष येलकर अकोला : कोरोनाकाळात मोफत शिवभोजन थाळी वाटपातून जिल्ह्यातील गरिब आणि गरजूंच्या पोटाला आधार मिळाला असून, जिल्ह्यातील २८ ...
संतोष येलकर
अकोला : कोरोनाकाळात मोफत शिवभोजन थाळी वाटपातून जिल्ह्यातील गरिब आणि गरजूंच्या पोटाला आधार मिळाला असून, जिल्ह्यातील २८ शिवभोजन थाळी वाटप केंद्रांना अनुदान वाटप करण्यासाठी शासनामार्फत एक कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील शिवभोजन थाळी वाटप केंद्रांना मंगळवार, १४ सप्टेंबरपासून अनुदानाच्या रक्कमेचे वाटप जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी गत १४ एप्रिलपासून शासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. कोरोना आणि निर्बंधाच्या कालावधीत गरीब आणि गरजू व्यक्तींची भूक भागविण्यासाठी शासनाच्या शिवभोजन योजनेंतर्गत १५ एप्रिलपासून मोफत शिवथाळीचे वाटप सुरू करण्यात आले. त्यामध्ये जिल्हयात २८ शिवभोजन केंद्रांमार्फत गरीब व गरजूंना मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात सुरू करण्यात आले. १५ एप्रिल ते ऑगस्ट अखेरपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांमार्फत गरीब आणि गरजूंना ४ लाख ६८ हजार १०० थाळींचे मोफत वाटप करण्यात आले. मोफत शिवभोजन थाळी वाटपातून गरजूंच्या पोटाला आधार मिळाला. मोफत शिवभोजन थाळी वाटप करणाऱ्या जिल्ह्यातील २८ केंद्रांना शिवभोजन थाळींचे अनुदान वाटप करण्यासाठी शासनामार्फत एक कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत गत आठवड्यात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांना अनुदान रकमेच्या धनादेशाचे वाटप १४ सप्टेंबरपासून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
एप्रिल ते ऑगस्ट अखेरपर्यंत
मोफत शिवभोजन थाळी वाटपाचे वास्तव !
कालावधी थाळी
१५ ते ३० एप्रिल ४६५००
१ ते ३० मे ९४५००
१ ते ३० जून १०३५००
१ ते ३१ जुलै ११७८००
१ ते २३ ऑगस्ट १०५८००
...................................................................
एकूण ४६८१००
..........................................................
कोरोनाकाळात शासननिर्णयानुसार शिवभोजन केंद्रामार्फत गरीब आणि गरजूंना १५ एप्रिलपासून मोफत शिवभोजन थाळींचे वाटप करण्यात येत आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६८ हजार १०० थाळींंचे माेफत वितरण करण्यात आले. जिल्ह्यात २८ शिवभोजन केंद्रांमार्फत मोफत थाळींचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांना अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांना अनुदान रकमेच्या धनादेशाचे वाटप मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
बी. यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.