यंदा १ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:31 AM2020-05-30T10:31:34+5:302020-05-30T10:31:49+5:30
पहिली ते आठवीच्या १ लाख ४३ हजार ७८५ विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने शैक्षणिक सत्र २0२0-२१ वर्षाकरिता इयत्ता पहिली ते आठवीच्या १ लाख ४३ हजार ७८५ विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्याची पाठ्यपुस्तके शनिवारपासून तालुकानिहाय ठरविलेल्या केंद्रावर पाठविण्यात येणार असल्याची समग्र शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर लहाने यांनी दिली.
कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता, २0२0-२१ वर्षाच्या शैक्षणिक सत्रास विलंबाने सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु परिस्थिती नियंत्रणात आली तर शैक्षणिक नियोजन तयार असायला हवे, या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा कधीपासून सुरू होतील, याची निश्चिती नसली तरी शैक्षणिक सत्राची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. शाळा सुरू होतील तेव्हा होतील; परंतु पुस्तके शाळांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि शाळा सुरू झाल्यावर पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडली पाहिजेत, असा शिक्षण विभागाचा उद्देश आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय पाठ्यपुस्तके पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. पुस्तके वितरणाचे काम पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गट समन्वयक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, विशेष शिक्षक आदींचे गट तयार करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करीत ७ तालुक्यांमध्ये पाठ्यपुस्तके शनिवारपासून केंद्रांवर पोहोचणार आहेत.
समग्र शिक्षा अंतर्गत यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ८ लाख ३६ हजार मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांच्या मार्गदर्शनात नियोजन केले असून, १५ जूनपर्यंत शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचतील.
- नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान.