पोलीस निवासस्थानांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 01:37 AM2017-06-08T01:37:43+5:302017-06-08T01:37:43+5:30
लवकरच निविदा प्रक्रिया : पालकमंत्री पाटील यांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला पोलिसांच्या गृहनिर्माण सोसायटीसह ३६० पोलीस निवासस्थानांचा सामाजिक न्याय भवनाच्या जागेमुळे अडलेला प्रश्न अखेर बुधवारी मार्गी लागला आहे. गृह राज्यमंत्री तथा नगरविकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीनंतर हा तिढा सुटल्याने लवकरच निविदा प्रक्रिया राबवून, या निवासस्थान बांधकामास प्रारंभ होणार आहे.
अकोला येथे निमवाडी परिसरातील गृहविभागाच्या असलेल्या खुल्या जागेवर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ३६० निवासस्थाने बांधण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याच जागेच्या काही भागात सामाजिक न्याय भवन उभारण्यात येणार असल्याने निवासस्थानांचे बांधकाम रखडले होते. मात्र, यासाठी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुंबईत बैठक घेऊन दोन्ही बांधकामाचा तिढा सोडविला आहे. या संदर्भातील सर्वसमस्यांचे निराकरण करण्यात आले असून, लवकरच पोलिसांना हक्काचे निवासस्थान मिळणार आहे.
या संदर्भात निविदा प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करून पुढील बांधकाम प्रक्रिया तत्काळ करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत आयोजित असलेल्या बैठकीला गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाचे महासंचालक दीपक पांडे, सुप्रिटेंडंट इंजिनिअर अरुणकुमार खोत, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अकोला महापालिका आयुक्त अजय लहाने उपस्थित होते.