अकोलेकरांना मिळणार मोफत वायफाय सुविधा
By Admin | Published: October 16, 2015 02:13 AM2015-10-16T02:13:26+5:302015-10-16T02:13:26+5:30
नऊ सिग्नलच्या ठिकाणी यंत्रणा; ५00 मीटर परिसरात कनेक्टिव्हिटी.
आशिष गावंडे /अकोला : महापालिका कार्यालयासह चारही झोन कार्यालये व काही शासकीय कार्यालयांना १५ वर्षांपर्यंत फोर-जी इंटरनेटची मोफत सुविधा देण्यासोबतच, आता सामान्य अकोलेकरांना सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा देण्यावरही रिलायन्स कंपनीने शिक्कामोर्तब केले आहे. शहरात नऊ ठिकाणी उभारल्या जाणार्या सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून ५00 मीटरच्या परिसरात वायफायची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. शहरात फोर-जी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स कंपनीने मनपा प्रशासनासोबत करार केला. मध्यंतरी ५८ किलोमीटर अंतराचे खोदकाम झाल्यानंतर उर्वरित खोदकामासाठी कंपनीने हात आखडता घेतला होता. आयुक्त अजय लहाने यांनी महापालिकेची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीने नवीन खोदकामाची परवानगी मागितली. आयुक्तांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर कंपनीला उर्वरित १७ किलोमीटरच्या खोदकामाची परवानगी देण्यात आली. फोर-जीची सुविधा अतिशय गतिमान असून, कंपनीच्यावतीने मनपा कार्यालयासह चारही झोन कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पंधरा वर्षांपर्यंत मोफत इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे मनपासह इतर शासकीय कार्यालयांमध्येही मोफत वायफाय सेवा उपलब्ध होईल. महत्वाचे म्हणजे, शहरात विविध ठिकाणच्या नऊ सिग्नल यंत्रणांच्या माध्यमातून अकोलेकरांनादेखील मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय रिलायन्स कंपनीने घेतला आहे. त्यानुषंगाने सिग्नलच्या ठिकाणी प्रत्येकी दोन डक्ट टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यातील एका ह्यडक्टह्णच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा सुरू केली जाईल, तर दुसर्या डक्टद्वारे वायफाय सेवा सुरू होईल. पश्चिम महाराष्ट्रातील इस्लामपूर शहरानंतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मोफत वायफाय सुविधा देणारी ही राज्यात दुसर्या क्रमांकाची महापालिका ठरेल.