आदर्श क्रेडिट सोसायटीचे खाते गोठविल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी अडकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:10 AM2019-11-18T11:10:53+5:302019-11-18T11:11:09+5:30
विदर्भातील अकोला, परतवाडा, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर, कोंढाळी, रामटेक, चंद्रपूर येथील गुंतवणूकदार यामध्ये अडकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: चौदा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपामुळे प्रकाशझोतात आलेल्या आदर्श क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे संपूर्ण खाते गोठविल्या गेल्याने विदर्भातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. यामध्ये अकोल्याचादेखील समावेश असून, स्थानिक टिळक मार्गावरील कार्यालयास कुलूप लागून आहे. अकोल्यातील लघू व्यापारी आणि खातेदारांचे एक कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.
अहमदाबाद येथे मुख्य कार्यालय असलेल्या आदर्श क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये १४ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याने त्याची चौकशी सुरू झाली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आदर्श सोसायटीचे संपूर्ण खाते गोठविले आहे.
सोबतच सोसायटीच्या जबाबदार संचालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली आहे. याचा फटका विदर्भातील गुंतवणूकदारांनादेखील बसला असून, त्यांचे कोट्यवधी रुपये वादात सापडले आहे. विदर्भातील अकोला, परतवाडा, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर, कोंढाळी, रामटेक, चंद्रपूर येथील गुंतवणूकदार यामध्ये अडकले आहे.
विदर्भाला जवळपास ५० कोटी रुपये यामध्ये अडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपरोक्त शाखांमधील खाते गोठविल्या गेल्याने संपूर्ण उलाढाल बंद पडली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्रासले आहे. अडकलेली रक्कम गुंतवणूकदारांना आता कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आॅनलाइन करंट अकाउंटचे व्यवहार या सोसायटीत मोठ्या प्रमाणात होत असल्याने लघू व्यापारी आणि उद्योजकांची मोठी रक्कम आदर्शमध्ये होती. ही आता धोक्यात सापडली आहे.