पिंजर परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:37+5:302021-06-18T04:14:37+5:30
ग्रामसेवकाला मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी निहिदा : परिसरातील शेलू बु. येथील ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ...
ग्रामसेवकाला मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी
निहिदा : परिसरातील शेलू बु. येथील ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक वेळेवर न येणे, कार्यालयात उपस्थित नसल्याचे प्रकार वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दोन गावांचा जलजीवन मिशनमध्ये समावेश
पातूर : जलजीवन मिशनअंतर्गत स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेकरिता टंचाईग्रस्त गावांमध्ये पातूर तालुक्यातील भंडारज बु., शिर्ला गावांचा समावेश करण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना बुधवारी साकडे घातले. त्यासाठी गटनेता अजय ढोणे यांनी पाठपुरावा केला.
दनोरी-पनोरी रस्त्याची दुरवस्था
चोहोट्टा बाजार : अकोट-अकोला मार्गावरील पळसोद फाट्यावरून दनोरी-पनोरी गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता की मृत्यूचा सापळा’ अशी परिस्थिती आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दोन वर्षांपासून पीक विमा मिळाला नाही
रोहनखेड : खारपाणपट्ट्यात येत असलेल्या रोहनखेड परिसरात गत चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीमुळे पिकांचे नुकसान झाले. मूग, उडीद, सोयाबीन, कपाशीसारख्या पिकांवर रोगराई आल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमासुद्धा काढला होता. महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षणसुद्धा केले. परंतु दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला नाही.
अकोट शहरात पथदिवे बंद; नागरिकांमध्ये रोष
अकोट : शहरातील अकोला मार्गावरील शिवाजी चौक-अकोला नाकापर्यंतचे पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. सर्वत्र अंधार पसरलेला असताना कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. शहरातील विविध चौकातील हायमास्ट लाइट बंद आहे. अनेक प्रभागात पथदिवे बंद आहेत. लाखो रुपये खर्च करूनही पथदिवे बंद असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.
विझोरा-कानशिवणी बससेवा बंद
विझोरा : कोरोनामुळे कानशिवणी-विझोरा मार्गावरील सर्व बसफेऱ्या बंद आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना अनेक ठिकाणी बससेवा सुरू करण्यात आली. परंतु, विझोरा मार्गावरील बससेवा अद्याप सुरू करण्यात आली नाही. परिसरात बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
अकोला-मंगरूळपीर मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक
बार्शीटाकळी : अकोला-मंगरूळपीर मार्गालगत शिवापूर ते दगळपारवा दरम्यान रस्ता रुंदीकरण कामासाठी वृक्ष कापण्यात आली होती. परंतु ही कापलेली लाकडे जैसे थे अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे.