एरंडा फीडरवरील वीज पुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:47+5:302021-09-13T04:18:47+5:30
विझोरा : येथील महावितरण उपकेंद्राच्या मनमानी कारभारामुळे एरंडा फीडरवरील वीज पुरवठा रात्री वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. ...
विझोरा : येथील महावितरण उपकेंद्राच्या मनमानी कारभारामुळे एरंडा फीडरवरील वीज पुरवठा रात्री वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली मनमानी कारभार सुरू असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
विझोरा येथील उपकर्षण केंद्रातून एरंडा गावठाण फीडरला वीज पुरवठा केला जातो; परंतु या फीडरवर वारंवार बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. ऐन रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा बंद होत असल्याने ग्राहकांच्या घरातील वीज उपकरणे निरुपयोगी झाली आहेत. शनिवारी रात्री एरंडा फीडरवरील वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने विझोरा, गोरव्हा, एरंडा, परंडा येथील गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली. गत चार दिवसांपूर्वी सुद्धा असाच प्रकार घडत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
---------------------------------
मान्सूनपूर्व कामे अपूर्ण
पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनीवरील देखभालीची कामे करणे गरजेचे असते; परंतु अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व कामे अपूर्ण आहेत. एरंडा गावाजवळ बऱ्याच ठिकाणी मुख्य लाइनवर मोठ्या प्रमाणात झाडाच्या फांद्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे चित्र आहे.
-----------------
शेंद येथे आठ दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत
कानडी : येथून जवळच असलेल्या शेंद येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. शेंद येथे (मुरंबा ता. मूर्तिजापूर) या उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे समस्या वाढली आहे. सरपंचासह ग्रामस्थांनी निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र, अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे. महावितरणच्या वरिष्ठांनी दखल घेऊन गावाचा वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सरपंच गोवर्धन खडसे यांनी केली आहे.