महापौर-उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:50 AM2019-11-17T10:50:39+5:302019-11-17T10:50:48+5:30
विभागीय आयुक्तांनी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
अकोला : अकोला महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. दोन्ही पदांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने अमरावती विभागीय आयुक्तांनी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
नगरविकास विभाग मंत्रालयाचे अवर सचिव यांच्या निर्देशान्वये आणि अमरावती विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार अकोला महापालिकेचे नगर सचिव अनिल बिडवे यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित सर्वसाधारण सभेत ही निवडणूक होणार आहे. या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर राहणार आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते २ वाजतापर्यंत नामनिर्देशन अर्ज वितरित होतील. त्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील. २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक सुरू होण्याच्या छाननी दरम्यान १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.
भाजपचे दोन्ही पदांचे दावेदार निश्चित
अकोला महापालिकेचे मावळते महापौर विजय अग्रवाल आणि उपमहापौर वैशाली शेळके यांचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. भाजप बहुमतात असल्याने पुन्हा भाजपच्या वाट्याला दोन्ही पदे येत आहेत. पक्षश्रेष्ठी आणि खासदार-आमदारांच्या मर्जीतील नगरसेवकांची निवड होईल.