दगडाने ठेचून मित्रानेच केली मित्राची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 02:40 PM2019-09-20T14:40:18+5:302019-09-20T14:40:33+5:30
राजेश सुधाकर पिंपळे (५३) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते डाबकी रोड येथील रहिवासी आहेत
अकोला : डाबकी रोडवरील नर्मदा अपार्टमेंटजवळ दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका इसमाने त्याच्या मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. यातील आरोपी पळून जाण्याच्या बेतात असतानाच, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजेश सुधाकर पिंपळे (५३) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते डाबकी रोड येथील रहिवासी आहेत. नवनाथ बंडू कारंडे असे आरोपीचे नाव आहे. मृतक राजेश आणि नवनाथ मित्र असून, त्यांच्यात बुधवारच्या रात्री दीड वाजताच्या दरम्यान दारूच्या कारणावरून वादविवाद झाला. याच वादात नवनाथन याने राजेशच्या डोक्यात सिमेंटचा दगड घातला. यामुळे राजेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना डाबकी रोड भागातील श्री राम टॉवरच्या परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडल्याने मृतदेह काही काळ तिथेच पडलेला होता. याप्रकरणी मृतकाचा मुलगा अभय राजेश पिंपळे यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.यावरून पोलिसांनी प्रथमत: आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
या घटनेची माहिती डाबकी रोड पोलिसांना देताच ठाणेदार विजय नाफडेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. सखोल चौकशी करून हा खूनच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी हा पळून जाण्याच्या बेतात असतानाच, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
--------------------------
सीसी कॅमेऱ्यांची तपासणी
या हत्याकांडानंतर डाबकी रोड पोलिसांनी तपास करताना परिसरातील सीसी कॅमेºयांची तपासणी सुरू केली आहे. राजेश सुधाकर पिंपळे यांची हत्या करण्यामागे आरोपी एकटाच आहे की आणखी काही साथीदार आहेत याचा शोध पोलीस घेत आहे. रम्यान,डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.