मित्रानेच केला मित्राचा खून!
By admin | Published: September 24, 2016 03:13 AM2016-09-24T03:13:20+5:302016-09-24T03:13:20+5:30
अकोल्यातील घटना; दारुच्या नशेत क्षुल्लक कारणावरून झाला होता वाद.
अकोला, दि. २३- मरगट परिसरातील इक्बाल कॉलनी येथील रहिवासी २८ वर्षीय युवकाची त्याच्याच मित्राने फावड्याचा दांडा डोक्यात घालून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हत्या केल्यानंतर आरोपी रामदास पेठ पोलिसांना शरण आला असून, दारुच्या नशेत हे हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा रजेवर गेल्यानंतर २४ तासातच शहरात हे दुसरे हत्याकांड घडले.
इक्बाल कॉलनी येथील रहिवासी शेख मुशीर शेख नासीर (२८) व त्याचा मित्र शेख राजू शेख मुस्तफा (२८) हे दोघे मजुरीचे काम करतात. शुक्रवारी सकाळी दोघेही कामावर सोबत गेले, त्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. शुक्रवारी दुपारपासून सुरु झालेले वाद सायंकाळपर्यंत सुरूच होते. या किरकोळ वादातून शेख राजू शेख मुस्तफा संतापल्याने त्याने शेख मुशीर शेख नासीर हा त्याच्या घरी खाटेवर झोपलेला असताना डोक्यात फावड्याच्या लाकडी दांड्याने हल्ला चढविला. यामध्ये शेख मुशीर शेख नासीर याचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीलाही या हाणामारीत किरकोळ दुखापत झाली. शेख मुशीर याची हत्या केल्यानंतर आरोपी राजू हा थेट रामदास पेठ पोलिसांना शरण आला. राजूला त्याच्या आईनेच पोलीस स्टेशनमध्ये आणल्याची माहिती आहे. गुरुवारी सायंकाळी जमील अली नजरत अली याची गांधी रोडवरील चौपाटीवर हत्या करण्यात आली होती, त्यानंतर २४ तासाच्या आतच शेख मुशीर याची हत्या झाली. या हत्येमुळे इक्बाल कॉलनीत एकच खळबळ उडाल्याने मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, रामदास पेठचे ठाणेदार सुभाष माकोडे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.