जयंत पाटलांसमोरच चव्हाट्यावर आली जिल्हा राष्ट्रवादीतील धुसफुस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:11 PM2021-02-07T16:11:18+5:302021-02-07T16:31:01+5:30
Jayant Patil News मुर्तीजापूरात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली.
मुर्तीजापूर : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री मुर्तीजापूरात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली. परिवार संवाद दौऱ्यानिमित्त पार पडलेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उघड उघड गटबाजी व नाराजीचे दर्शन झाले. माजी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीधर कांबे यांनी जिल्हा नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त करुन शिवा मोहोड यांच्यावर घणाघाती टीका केली. जिल्ह्य़ातील युवक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून, जिल्हा अध्यक्ष मनमानी करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याच गोंधळात श्रीधर कांबे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी झाली. शहर अध्यक्ष राम कोरडे आणि महाराष्ट्र संघटन सचिव रवी राठी यांच्यात काही विषयावरून मतभेत असल्याचे उघड झाले. मूर्तिजापूर विधानसभा उमेदवार निवडून का आले नाहीत, यावर मंथन सुरू असताना रवी राठी यांनी विश्लेषण करताना तालुक्यातील जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांना डावलल्याचे सांगताच अध्यक्ष राम कोरडे यांनी आक्रमक होऊन आक्षेप नोंदविला. त्यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला. निवडणूकीच्या 'हिशेबावरुन' आतुन लागलेली ही आग काय रुप धारण करते हे महत्वाचे आहे. यावरुन स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधील नाराजी व गटबाजी निश्चित चव्हाटय़ावर आली आहे.