संचारबंदीचा फळ बाजाराला फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:19 AM2021-04-28T11:19:27+5:302021-04-28T11:19:33+5:30
Fruit Market in Akola : आवक निम्म्यावर आली असून, दरही कमी झाले आहेत.
अकोला : कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवावगळता आठवडी बाजार बंद आहे. त्याचे परिणाम फळ बाजारात पहायला मिळत आहे. फळं कमी प्रमाणात येत आहेत. आवक निम्म्यावर आली असून, दरही कमी झाले आहेत. दररोज जवळपास ३०-३५ टन आवक होत आहे.
संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसोबत शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगाम समोर आला असून, मशागतीसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात फळ उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. बाजारात योग्य दर मिळत नसल्याने कमी दरात मालाची विक्री करावी लागत आहे. अकोल्यासह औरंगाबाद, जालना, नागपूर, परभणी या जिल्ह्यातून अकोल्यातील बाजारात फळांचा माल येत असतो; परंतु ग्रामीण भागातील आठवडी बाजार ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. जिल्ह्यातही सकाळी ११ पर्यंत फळविक्रीची परवानगी आहे. त्यामुळे फळविक्रेत्यांकडून मालाची उचल कमी प्रमाणात होत आहे. याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत आहे. फळ बाजारात मालाला समाधानकारक दर मिळत नाही. शहरातील फळ व भाजीबाजार सुरू आहे; पण त्यालाही वेळेचे बंधन आहे. त्यामुळे माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.
टरबूज, खरबूजची आवक ६० टक्के
संचारबंदीमुळे ऐन उन्हाळ्यात टरबूज, खरबूज विक्री घटली आहे. उचल नसल्याने बाजारात ६० टक्के आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तर आंब्याची विक्री ४० टक्के घटली आहे. चार तासांत माल विकावा तरी किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अननसची मागणी शून्यावर
अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने जिल्ह्यातील रसांची दुकाने बंद आहेत. रसविक्री बंद असल्याने अननसची मागणी शून्यावर आली आहे. दरही कमी झाले आहे. यासोबत मोसंबीची मागणीही घटली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी असल्याने मालाची उचल कमी आहे. फळविक्रेते माल कमी प्रमाणात घेत असल्याने बाजारात मालाची आवक घटली. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.
आरीफ खान, फळ व्यापारी