मदतीने निराशा; आता पीक विम्याची आशा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:00 AM2019-11-19T11:00:17+5:302019-11-19T11:00:29+5:30
पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकऱ्यांची निराशा झाली.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकऱ्यांची निराशा झाली असून, आता पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ मिळाला पाहिजे, अशी आशा पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून केली जात आहे.
गत महिनाभराच्या कालावधीत बरसलेल्या अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर, भात इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी राज्यपालांकडून १६ नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत मर्यादेत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च आणि पिकांचे बुडालेले उत्पादन बघता, पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकºयांची निराशा झाली आहे. पीक नुकसान भरपाईच्या सरकारी मदतीने निराशा केली असल्याने, आता किमान पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून केली जात आहे.
पंचनामे ग्राह्य धरून पीक विम्याचा लाभ द्या!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात १ कोटी १२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले; मात्र पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकºयांना विमा रकमेचा भरीव लाभ मिळाला पाहिजे.
महसूल, कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पीक नुकसानाचे पंचनामे ग्राह्य धरून, विमा कंपन्यांनी शेतकºयांना पीक नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.