वडिलांची दिशाभूल करीत संपत्ती लाटणारा पुत्र फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:29+5:302021-09-08T04:24:29+5:30
शहरातील प्रसिध्द उद्याेजक सुरेश ढवळे यांना दाेन मुले असून माेठा मुलगा कुटुंबासह अमेरिकेत असताना त्यांचाच लहान भाऊ पुष्कर सुरेश ...
शहरातील प्रसिध्द उद्याेजक सुरेश ढवळे यांना दाेन मुले असून माेठा मुलगा कुटुंबासह अमेरिकेत असताना त्यांचाच लहान भाऊ पुष्कर सुरेश ढवळे याने वडिलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करीत तसेच त्यांची दिशाभूल करून संपत्ती बक्षीसपत्राव्दारे हडपली़ त्यांचे वडील सुरेश उत्तमराव ढवळे यांचे १३ फेब्रुवारी २०२१ रोजी निधन झाले होते़. मात्र त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यासाठी पुष्कर सुरेश ढवळे कारणीभूत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सुरेश उत्तमराव ढवळे यांना पार्किनसन आजार असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील डॉ. वाडिया यांचे उपचार सुरू हाेते़ या उपचाराने सुरेश ढवळे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती़ मात्र तक्रारकर्त्याचा भाऊ पुष्कर ढवळे याने वडिलांना उपचारांसाठी मुंबई येथे ३० ऑक्टोबर २०१८ रोजी अपॉइंट घेतली होती. ठरल्याप्रमाणे पुष्कर त्यांच्या वडिलांना तपासणीसाठी घेऊन जाणार होता, मात्र ऐन वेळेवर पुष्करने वडिलांना डॉ. वाडिया यांच्याकडे नेले नाही. यानंतरही पुष्करने वडिलांच्या उपचारांसाठी चालढकल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पुष्कर हा लहानसहान कारणांवरून घरात वाद घालत हाेता़ त्यामुळे सुरेश ढवळे यांना त्रास आणखी व्हायचा आणि याच आजाराचा फायदा घेत त्यांच्या नावावरील मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न पुष्कर ढवळे करीत हाेता़ दरम्यान २९ जुलै २०२० रोजी आरोपी पुष्कर याने मृत्युपत्र करून सिद्धी बंगलोमधील वडिलांचा ५० टक्के हिस्सा स्वत:च्या नावावर बक्षीसपत्र व २३ डिसेंबर २०२० रोजी स्वत:च्या नावावर करून घेतला. तसेच २६ डिसेंबर २०२० रोजी मूर्तिजापूर रोडवरील स्थावर मिळकत स्वत:च्या नावावर हस्तांतरित करून घेतल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केल्यानंतर पुष्कर ढवळेविरुध्द न्यायालयाच्या आदेशावरून खदान पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत़ त्यानंतर आराेपीचा शाेध सुरू करण्यात आला असून ताे फरार झाला आहे़
पाेलिसांनी केला घटनास्थळ पंचनामा
खदान पाेलिसांनी मंगळवारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला़ तसेच तक्रारकर्त्यांनी केलेल्या आराेपांच्या प्रत्येक बाबीची तपासणी पाेलिसांनी सुरू केली आहे़ ज्या बंगल्यात सुरेश ढवळे यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी पाेलिसांनी तपासणी केली़
आराेपीची जामिनासाठी धावपळ
पुष्कर सुरेश ढवळे या आराेपीने आता अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू केली़ मात्र त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयाने पाेलिसांना मागितल्याची माहिती आहे़ पाेलिसांनी दाखल केल्यानंतर या प्रकरणात आराेपीच्या जामीन अर्जावर सुनावणी हाेणार असल्याची माहिती आहे़