घरकुल कामांचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा! जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 02:08 PM2019-06-22T14:08:29+5:302019-06-22T14:09:04+5:30
अकोला : आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, जिल्ह्यातील घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी शुक्रवारी दिले.
अकोला : आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, जिल्ह्यातील घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत जिल्हा नियामक मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. एच. आर. मिश्रा, जिल्हा नियामक मंडळाचे सदस्य प्रा. सुनील लांडे, गजानन भटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना इत्यादी योजनांतर्गत जिल्ह्यातील घरकुल बांधकामांसाठी उपलब्ध निधी आणि पूर्ण करण्यात आलेली घरकुलांची कामे यासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. आवास योजनांची कामे मार्गी लावून घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी यावेळी दिले. पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थींना जागा खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्यानुषंगाने जागा खरेदीसाठी निधी वाटपाच्या कामाचा आढावा तसेच जिल्ह्यातील बचत गट स्थापनेच्या कामाचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.