अतिक्रमीत जागेवर शौचालय बांधण्यासाठी मिळणार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2016 02:02 AM2016-03-04T02:02:53+5:302016-03-04T02:02:53+5:30
शहरी भागासाठी निकषात बदल; झोपडपट्टय़ात स्वच्छता मोहिम पोहचविण्यासाठी शासनाचे पाऊल.
वाशिम: स्वच्छ भारत मिशन आता शहरी भागातही राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शहरात अतिक्रमीत जागेवरही शौचालय बांधण्यासाठी परवागनी व निधी देण्यात येणार आहे.
सध्या संपूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यावर भर देण्यात येत आहे. याकरिता शासनाच्या वतीने ग्रामीण भागाकरिता १२ हजार रूपयांचा निधीही देण्यात येत आहे. ग्रामीण भागात राबविण्यात येणार्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अतिक्रमीत जागेवर शौचालय बांधण्याची परवानगी व निधी देण्यात येत नाही. मात्र शहरी भागात या नियमाला बदलण्यात आले आहे. अनेक शहरांमधील झोपडपट्टी ही अतिक्रमीत जाग्यावर बांधण्यात आली आहे. बहूतांश झोपडपट्टयांधमील नागरिक उघड्यावर शौचालयाला जातात. नाल्या व घाण एकाच ठिकाणी साचते. तसेच त्यांचे वास्तव्यही त्याच ठिकाणी असल्यामुळे विविध आजार बळावतात. यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. मुलांच्या खेळण्याकरिता मोकळी सोडण्यात आलेली मैदानेही अनेक शहरांमध्ये शौचालये बनली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही स्वच्छ भारत मिशन राबविण्याची गरज असल्याचे शासनाच्या लक्षात आले. शहरात ही मोहीम राबविताना अतिक्रमीत जागेवर शौचालय बांधण्यासाठी नकार देण्यात आल्यामुळे अनेकांनी शौचालय बांधण्याकडे पाठ फिरविली. परिणामी शासनाने शहरांमध्ये अतिक्रमीत जागेवर शौचालय बांधण्यासाठी परवागनी दिली आहे. तसेच निधीही देण्यात येणार आहे.