अकोला जिल्ह्यातील १८८५ पैकी ११८ किमीच्या रस्त्यांसाठीच निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:08 PM2018-04-04T16:08:33+5:302018-04-04T16:08:33+5:30
अकोला: अकोला जिल्ह्यासाठी २००१ ते २०२१ या काळातील रस्ते विकास आराखड्यातील १८८५ कि.मी.चे रस्ते नव्याने तयार करावे लागणार आहेत. त्यापैकी चालू वर्षात जिल्ह्यातील २८ रस्त्यांच्या ११८ किमी बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपये निधी देत शासनाने जिल्ह्याची बोळवण केली आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला: अकोला जिल्ह्यासाठी २००१ ते २०२१ या काळातील रस्ते विकास आराखड्यातील १८८५ कि.मी.चे रस्ते नव्याने तयार करावे लागणार आहेत. त्यापैकी चालू वर्षात जिल्ह्यातील २८ रस्त्यांच्या ११८ किमी बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपये निधी देत शासनाने जिल्ह्याची बोळवण केली आहे. या प्रमाणात रस्त्यांसाठी निधी मिळाल्यास आणखी दहा ते बारा वर्षे जिल्ह्याच्या रस्ते विकासाला लागण्याची शक्यता आहे.
आराखड्यात जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण मार्गांची एकू ण लांबी २,१५३ कि.मी. आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेने ६५७ कि.मी. रस्त्यांची निर्मिती केली. १,४९५ कि.मी.चे रस्ते निर्मिती करण्यासाठी निधीची गरज आहे. त्याचवेळी प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याचा सपाटा शासनाने लावला आहे.
आधी जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांपैकी कामे न झालेल्या रस्त्यांची लांबी १,४९५ कि.मी. आहे. या रस्त्यांना प्रारूप आराखड्यात क्रमांक देण्यात आले आहेत. त्या रस्त्यांवर केवळ बैलगाड्या चालू शकतात. आराखड्यात आहेत; पण त्या रस्त्यांवर मुरूम टाकला नाही, खडीकरण झाले नाही, कोणत्याही तुकड्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण झाले नाही, तसे काम झाल्याची त्या रस्ता क्रमांकावर नोंद नाही, ते रस्ते आराखड्यानुसार मिसिंगमध्ये गणले जातात. त्या कामांसह काही इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्गाच्या काही किमीच्या कामांसाठी शासनाकडून निधी दिला जात आहे. ते प्रमाण तुटपुंजे असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांचे रूप बदलण्यास आणखी बरीच वर्ष लागण्याची शक्यता आहे.
कामासाठी निधी मिळालेले रस्ते
अकोला तालुक्यातील अनकवाडी-आपातापा, कोठारी-तामशी, रामगाव-दापुरा, रामगाव-मुजरे मोहम्मदपूर, काटी, पाटी जोडरस्ता, रोहणा-ब्रह्मपुरी, वडद जोड रस्ता, अकोट तालुक्यातील केळीवेळी-गिरजापूर, दिवठाणा जोड रस्ता, मंचनपूर रस्ता, ढगा फाटा-करतवाडी, रंभापूर जोड रस्ता, बार्शीटाकळी तालुका वरखेड-अंजनी खु., खोपडी-माळशेलू, बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव-लोहारा, भिकुंडखेड रस्ता, मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज-उनखेड, सांगवा मेळ-कौलखेड, साखरी-सिरसो, पातूर तालुक्यातील चौफुली ते वसाली, दिग्रस फाटा ते तांदळी बु., गोंधळवाडी-दुधाणी, बाभूळगाव-सस्ती, तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे-निंभोरा-पातुर्डा, रायखेड-चांगलवाडी, वाडी-अवार अशा एकूण २८ रस्त्यांच्या ११८ किमीच्या कामांसाठी ८३ कोटी ५१ लाख रुपये निधी शासनाने दिला आहे.