निधी ६७ लाख; कामांची यादी ५ कोटींची !
By Admin | Published: September 15, 2016 02:54 AM2016-09-15T02:54:04+5:302016-09-15T02:54:04+5:30
तीर्थक्षेत्र विकास योजनेला अकोला जि.प.च्या सर्वसाधारण सभेची मंजुरी.
अकोला, दि. १४ : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हय़ातील तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी केवळ ६७ लाख ४0 हजार रुपयांचा निधी उपलब्ध असला, तरी ५ कोटी १२ लाखांच्या प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकासकामांच्या यादीला बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २0१५-१६ या वर्षात जिल्हय़ातील तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत २३ मार्च २0१६ रोजी जिल्हा परिषदेला ६७ लाख ४0 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हय़ातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व ग्रामपंचायतींमार्फत प्राप्त मागणी पत्रानुसार जिल्हय़ात ५ कोटी १२ लाख रुपयांची ५२ तीर्थक्षेत्रे विकासाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यानुसार केवळ ६७ लाख ४0 हजार रुपयांचा निधी उपलब्ध असताना, ५ कोटी १२ लाख रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकासकामांच्या यादीला जिल्हा परिषदेच्या सभेत मंजुरी देण्यात आली.