जिल्हा परिषद सभेतील मंजूर ठरावांविरोधात १७ ऑगस्टला पुढील सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:32 AM2021-07-21T11:32:27+5:302021-07-21T11:32:33+5:30
Akola ZP News : पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात येणार आहे.
अकोला : जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत २३ जून रोजी मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अपीलवर पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती. दरम्यान, पोटनिवडणुका स्थगित होण्यापूर्वी आचारसंहितेच्या कालावधीत २३ जून रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करीत जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर आणि सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांविरोधात अमरावती विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले. दाखल करण्यात आलेल्या अपीलवर मंगळवार, २० जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान अपीलकर्ता आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या विधिज्ञांचे मत नोंदविण्यात आल्यानंतर या अपीलवरील पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला.