४४११ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:50+5:302021-01-18T04:16:50+5:30
अकोला: जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी होणार असून, त्यामध्ये ४ हजार ४११ उमेदवारांच्या भवितव्याचा ...
अकोला: जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी होणार असून, त्यामध्ये ४ हजार ४११ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये १० ग्रामपंचायती अविरोध झाल्याने, २१४ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी मतदान घेण्यात आले असून, निवडणूक रिंगणातील ४ हजार ४११ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्रणांमध्ये (ईव्हीम) सीलबंद झाले. ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर सुरू होणार आहे. मतमोजणीत जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालात ४ हजार ४११ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये कोणकोण बाजी मारणार आणि कोणाकोणाला पराभावाचा सामना करावा लागणार, याबाबतचे चित्र सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीची तयारी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत पूर्ण करण्यात आली आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती,
उमेदवारांची अशी आहे संख्या!
तालुका ग्रा.पं. उमेदवार
तेल्हारा ३२ ६६४
अकोट ३५ ५२४
मूर्तिजापूर २७ ६००
अकोला ३६ ८००
बाळापूर ३५ ६५०
बार्शीटाकळी २६ ५००
पातूर २३ ३७६
....................................................................
एकूण २१४ ४४११
३३५ सदस्यांच्या अविरोध
निवडीवर होणार शिक्कामोर्तब!
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत १० ग्रामपंचायती अविरोध झाल्या. या १० ग्रामपंचायतींच्या ७४ उमेदवारांसह जिल्ह्यातील एकूण ३३५ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित करण्यात आली. संबंधित ३३५ उमेदवारांची अविरोध निवड झाल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. ३३५ सदस्यांच्या अविरोध निवडीवर १८ जानेवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.
जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून संबंधित तालुकास्तरावर सुरू होणार आहे. मतमोजणी पथकांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी