तडजोडी, छुप्या युतीवर उमेदवारांचे भवितव्य!

By Admin | Published: February 16, 2017 10:19 PM2017-02-16T22:19:16+5:302017-02-16T22:19:16+5:30

उमेदवार अस्वस्थ; प्रभाग रचनेमुळे होतेय दमछाक

Future of candidates for reconciliation, hidden coalition! | तडजोडी, छुप्या युतीवर उमेदवारांचे भवितव्य!

तडजोडी, छुप्या युतीवर उमेदवारांचे भवितव्य!

googlenewsNext

अकोला, दि. १६-महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांमध्ये बैचेनी वाढत चालली आहे. प्रभाग पुनर्रचनेमुळे प्रभागाचे अफाट वाढलेले भौगोलिक क्षेत्रफळ, नवख्या मतदारांची वाढलेली संख्या पाहता, मतांचा जोगवा मागणार्‍या उमेदवारांनी आता तडजोडीच्या राजकारणासह छुप्या युतीसाठी चाली खेळणे सुरू केल्याचे चित्र आहे.
महालिकेच्या २0 प्रभागांसाठी ८0 सदस्य निवडून जाणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल झाले. त्याचे परिणाम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राजकीय घडामोडींवर झाल्याचे पाहावयास मिळाले. प्रमुख राजकीय पक्षांनी यंदा युती किंवा आघाडी न करता निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात रंगत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. असे असताना प्रमुख राजकीय पक्षांना सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत, हे येथे उल्लेखनीय. राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय पॅनलद्वारे चार उमेदवार उभे केले आहेत. काही प्रभागांत एक किंवा दोन प्रवर्गातूनच उमेदवारांना तिकीट देण्यात आले. अर्थात, ज्या ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले नाहीत, अशा ठिकाणी संबंधित राजकीय पक्षासोबत तडजोड केली जाणार, हे निश्‍चित मानल्या जात आहे. काही मोजक्या प्रभागांमध्ये राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारलेल्या बंडखोरांनी पक्षाविरोधात रणशिंग फुंकले आहे. अशा अपक्ष उमेदवारांची संख्या कमी असली, तरी ज्या ठिकाणी पक्षाचे संपूर्ण पॅनल निघू शकते, असा पक्षाला विश्‍वास आहे, नेमक्या त्याच ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे पॅनलला धक्का लागण्याची दाट चिन्हं आहेत. याशिवाय युती किंवा आघाडी नसल्यामुळे काही उमेदवार स्वत:च्या पातळीवर छुप्या पद्धतीने इतर पक्षाच्या उमेदवारांसोबत हातमिळवणी करीत असल्याची माहिती आहे.

मतविभागणीचा फटका बसणार!

प्रमुख राजकीय पक्षांनी महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे मतविभागणी होणार, हे निश्‍चित आहे. निवडणुकीत एकमेकांना साथ देणार्‍या राजकीय पक्षाच्या उमेदवारांची यामुळे कोंडी झाली आहे. मतविभागणीचा फटका संबंधित उमेदवारांना बसणार असल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे.

Web Title: Future of candidates for reconciliation, hidden coalition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.