संपूर्ण लॉकडाऊनचा पहिल्याच रविवारी फज्जा; बाजारपेठ बंद; रस्त्यांवर मात्र वर्दळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 10:21 AM2020-08-03T10:21:11+5:302020-08-03T10:21:30+5:30
रविवार, २ आॅगस्ट रोजी संपूर्ण शहरातील बाजारपेठ लॉकडाऊन होती; मात्र संचारबंदीचा कुठेही लवलेश दिसून आला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत १ आॅगस्टपासून बाजारपेठेतील सम-विषम नियम रद्द करत सर्व दुकाने सोमवार ते शनिवारपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली असून, दर रविवारी संपूर्ण लॉकडॉऊन पाळण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार रविवार, २ आॅगस्ट रोजी संपूर्ण शहरातील बाजारपेठ लॉकडाऊन होती; मात्र संचारबंदीचा कुठेही लवलेश दिसून आला नाही. पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांची वर्दळ शहरातील सर्वच रस्त्यांवर दिवसभर दिसून आली.
गत महिन्यापासून लागू असलेला सम-विषम पद्धतीने दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय रद्द करण्याबाबत व्यापाºयांचा आग्रह होता त्यानुसार रविवार वगळता सोमवार ते शनिवार सर्वच दुकाने खुली ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आल्याने व्यापाºयांना दिलासा मिळाला आहे. व्यापाºयांनीही नियमांचे पालन करत रविवारी संपूर्ण लॉकडाऊन पाळले. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या लॉकडाऊनमधील सुरू असणारे किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीसुद्धा रविवारी बंद होती. व्यापाºयांनी लॉकडाऊनला संपूर्ण प्रतिसाद दिला. शहरातील कोणत्याही भागात कोणतेही दुकान उघडे नव्हते. नागरिकांकडून मात्र लॉकडाऊनला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घराबाहेरही पडता येणार नाही. असे निर्देश असतानाही शहरातील सर्वच रस्त्यांवर विनाकारण फिरणाºयांची मोठी वर्दळ पाहावयास मिळाली. यापूर्वी पुकारण्यात आलेल्या तीन दिवसाच्या लॉकडाऊन काळात शहरातील रस्त्यांवर पाहावयास मिळालेला शुकशुकाट रविवारच्या लॉकडाऊनमध्ये कुठेही दिसून आला नाही. दुचाकीवरून फेरफटका मारणाºयांना कोणत्याही भागात अटकाव झाला नाही. त्यामुळे दिवसभर सर्वच रस्त्यांवर नागरिकांची मोठी वर्दळ होती. अनेक ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात होते मात्र कुणालाही अटकाव करण्यात आला नाही.
दरम्यान सोमवारी रक्षाबंधन असल्याने रविवारी राखी विक्री मोठया प्रमाणात होते. रविवारीच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे राखी विक्रेत्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे या विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘वंचित’ने जिल्हाधिकारी निवासासमोर थाटले राखी विक्रीचे दुकान
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाºयांनी रविवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निवासस्थानासमोर राखी विक्रीचे दुकान थाटून जिल्हा प्रशासनाने लावलेला लॉकडाउन अमान्य केला.
व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना महापालिका व पोलीस दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचे तसेच दंड ठोठावत असल्याचे समजताच वंचितच्या पदाधिकाºयांनी जयहिंद चौकात काही दुकानांना दुकाने उघडण्याची विनंती केली.
त्यानुसार काही दुकानदारांनी राखी विक्रीची दुकाने सुरु केली. त्यानंतर वंचित पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांनी लावलेल्या लॉकडाऊनचा विरोध करीत थेट जिल्हाधिकारी यांच्या निवास स्थानासमोरच राखी विक्रीचे दुकान थाटून अभिनव आंदोलन केले.