गाडगेबाबांच्या सेवकाची देशभरातून लोकप्रतिनिधींनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:19 AM2021-01-03T04:19:39+5:302021-01-03T04:19:39+5:30
मूर्तिजापूर : कर्करोग पीडित रुग्णांची सेवा करणारे संत गाडगेबाबांचे सेवक प्रशांत देशमुख यांना पद्मश्री देण्याची मागणी जनता दरबारातून ...
मूर्तिजापूर : कर्करोग पीडित रुग्णांची सेवा करणारे संत गाडगेबाबांचे सेवक प्रशांत देशमुख यांना पद्मश्री देण्याची मागणी जनता दरबारातून उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत देशभरातील खासदार, आमदारांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून देशमुख यांचा गौरव करण्याची मागणी केली आहे. देशमुख यांना पद्मश्री मिळाल्यास विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
परदेशी बँकेतील नोकरीला लाथ मारत तारुण्यात गाडगेबाबांच्या विचारांनी झपाटत गाडगेमहाराजांचे एकनिष्ठ सेवक अच्युतराव गुलाबराव उर्फ दादासाहेब देशमुख यांचे नातू प्रशांत देशमुख यांनी दादरच्या धर्मशाळेत सेवक म्हणून कार्य सुरू केले. १९९५ मध्ये देशमुख हे पहिल्यांदा पत्नी व मुलासह येथे आले होते. येथूनच त्यांनी गाडगे महाराजांच्या विचारांचा व सेवेचा वारसा जोपासण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत दादरच्या धर्मशाळेच्या माध्यमातून ते कॅन्सर पीडित रुग्णांची सेवा करीत आहेत. धर्मशाळेच्या माध्यमातून देशभरातील रुग्णांना चांगल्या प्रतिचा आहार उपलब्ध करून देणे, वैद्यकीय उपचारासाठी साहाय्य करणे यासह महत्त्वाच्या जबाबदाऱ्या प्रशांत देशमुख हे पूर्ण करीत आहेत. गाडगेबाबांनी सांगितलेल्या दशसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी देशभरात विविध प्रकारच्या अभियानाच्या माध्यमातून सुमारे ३० वर्षांपासून कार्य सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी जनता दरबारातून उपस्थित केली होती. या संदर्भात ‘लोकमत’ ने २६ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून ही बाब लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिली होती. याची दखल घेऊन आता देशभरातील लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. गाडगेबाबांच्या निष्ठावंत सेवकाचा यथोचित गौरव करण्याची मागणी त्यांच्याकडून पत्रामध्ये उपस्थित करण्यात आली आहे.
..................…
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रपतींना पत्र
देशमुख यांना पद्मश्री देण्यासाठी गृह मंत्रालयाकडे देशभरातून पत्रव्यवहार सुरू आहे. याच क्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान, माजी मंत्री आ. संजय सत्येंद्र पाठक, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, महाराष्ट्राचे माजी मंत्री जयकुमार रावळ, बिहारचे माजी मंत्री आ.श्याम रजाक, आ. नितीन नवीन, आ.निखिलेश तिवारी, आ. संजय मयूक, आ. देवेनचंद्र ठाकूर, दिल्लीचे खा. मनोज तिवारी, कोलकत्ता येथील खा. मुकूल रॉय, फिरोजाबादच्या महापौर नूतन राठोड, मुंबईचे खा मनोज कोटक, राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे, तर बाळापुरचे आ. नितीन देशमुख, दर्यापूरचे आ.बळवंत वानखडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा आरंभिला आहे.
..............……
ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन
प्रशांत देशमुख हे १९९५ पासून दादरच्या धर्मशाळेत सेवक म्हणून कार्य करीत आहेत. त्यानंतर धर्मशाळेच्या मुख्य व्यवस्थापक पदाची सूत्रे त्यांच्या हाती आल्यावर ही धर्मशाळा जर्जर झाली होती. आव्हानात्मक स्थितीत देशमुख यांनी काम करीत धर्मशाळेची स्थिती सुधरवत येथे आज नंदनवन तयार केले. आता एकूण सात माळ्यांची धर्मशाळा असून, १५० खोल्या येथे आहेत. १ मोठा हॉल यांसह तीन लहान हॉल आहेत.