देशभरात कार्य करणारे गाडगेबाबांचे सेवक अजूनही दुर्लक्षित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:32+5:302020-12-26T04:15:32+5:30
मूर्तिजापूर : गाडगेबाबा यांचे ‘अहिंसा परमो धर्म’ या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून त्यांच्या ''ग्लोबल विस्तारा''च्या आलेखात खंड न पडू देता ...
मूर्तिजापूर : गाडगेबाबा यांचे ‘अहिंसा परमो धर्म’ या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून त्यांच्या ''ग्लोबल विस्तारा''च्या आलेखात खंड न पडू देता दादरच्या (मुंबई) धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी व्रतस्थपणे धर्मशाळेत लाखो कॅन्सर रुग्णांना व नातेवाइकांना हक्काचे छत्र उपलब्ध करून देत देशभरात गाडगेबाबांच्या विविध प्रकारच्या कार्याची ओळख करून दिली आहे. सरकारकडून त्यांची यथोचित दखल न घेतल्याची वास्तविकता आहे, त्यामुळे देशभरातून प्रशांत देशमुख यांना पद्मश्री पुरस्कार बहाल करण्याची मागणी होत आहे.
दादरच्या (मुंबई) संत गाडगे महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख हे संत गाडगेबाबांच्या सेवेचा वसा चालविण्यासाठी. मुंबई येथील टाटा ट्रस्टच्या कॅन्सर रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यात रुग्ण उपचारासाठी येतात. या कॅन्सरग्रस्त रुग्णांची येथे निवासाची व्यवस्था अल्प दरात केली जाते. परदेशी बँकेतील गल्लेलठ्ठ वेतनाला लाथ मारून प्रशांत देशमुख यांनी धर्मशाळेत सेवक म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते निष्कामपणे रुग्णांची सेवा करत आहेत. भारतभर गाडगेबाबांचा विचार पेरण्यास त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मथुरा, वृंदावन, महाराष्ट्र यांसह देशाच्या विविध राज्यांत त्यांच्याकडून गाडगेबाबांचे कार्य अविरतपणे सुरू असतानाही सरकारकडून त्यांच्या या कार्याची योग्य ती दखल न घेण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गैरविण्यात यावे, अशी मागणी देशभरातून होत आहे.