गडकरींनी अकोल्याचे पालकत्व स्वीकारावे!
By Admin | Published: February 6, 2016 02:22 AM2016-02-06T02:22:15+5:302016-02-06T02:22:15+5:30
संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे घातले.
अकोला : अकोला विमानतळ, न्यू तापडिया नगरातील रेल्वे उड्डाणपूल तसेच अकोला-संगारेड्डी या राष्ट्रीय महामार्गाच्याचौपदरीकरणाच्या कामांना गती देणे तसेच जिल्ह्यातील इतर विकासकामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे, असे साकडे खा. संजय धोत्रे यांनी घातले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त शुक्रवारी नितीन गडकरी अकोला दौर्यावर आले असता, खा. संजय धोत्रे यांनी अकोल्याच्या विकासाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. अकोला ते खंडवा रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करण्यासाठी निधी मंजूर झाला असला तरी व्याघ्र प्रकल्प व वन विभाग प्राधिकरणाच्या मंजुरीअभावी या मार्गाचे विकासकाम रखडले आहे. तसेच अकोला-नांदेड-संगारेड्डी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला असून, त्याचे चौपदरीकरण करण्यासोबतच अकोल्यातील विमानतळ, रेल्वे उड्डाणपूल यांसारख्या रखडलेल्या विकासकामांसाठी नितीन गडकरी यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे, असे साकडे खा. संजय धोत्रे यांनी घातले.