"गडकरीजी, एक 'लेटरबॉम्ब' अकोल्यातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावरही येऊ द्या!"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 11:41 AM2021-08-18T11:41:35+5:302021-08-18T15:45:17+5:30
Vanchint Bahujan Aghadi to Nitin Gadkari : वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष पुंडकर यांचे नितीन गडकरी यांना खुले पत्र.
अकाेला : वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा निर्माण करत आहेत म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. गडकरी यांनी शिवसेनेला या निमित्ताने आरसा दाखवला, हे योग्यच झाले. परंतु भाजपची सत्ता असलेल्या अकोला महानगरातील सर्वच अपूर्ण रस्ते आणि उड्डाण पूल यांच्या बाबतीत ते चकार शब्द ही काढत नाहीत, हे दुर्दैवी आहे. गडकरीजी, अकाेल्याचीही दखल घ्या, भाजपची सत्ता आहे अन् कामे संथ आहेत, अशी विनंतीवजा टाेला मारणारे खुले पत्र वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
डाॅ. पुंडकर यांनी नमूद केले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून भाजपचा खासदार केंद्रीय मंत्री, चार-चार आमदार आणि महानगरपालिकेत पूर्ण सत्ता व महापौर असलेल्या स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींचाही कारभार बघावा, तुम्ही कदाचित मोठ्या मनाने त्यांना माफ कराल; पण अकोलेकर जनता मात्र आता भाजपला आता माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुंडकरांनी पत्रात अकोल्यातील अंतर्गत रस्ते आणि महामार्गावरील रस्ते व उड्डाण पूल कित्येक वर्षांपासून अपूर्ण आहेत, याचा लेखाजाेखाच मांडला आहे. अकोला-अकोट, अकोला-वाडेगाव, अकोला-अमरावती महामार्गावर कित्येक निष्पाप लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत, तरीही ते काम पूर्ण होत नाहीत. या कामात भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी अक्षम्य दुर्लक्ष केले असून, अकोल्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे, संबंधित रस्त्यांचे ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी संगनमताने मलाई खात आहेत, असा आराेप केला आहे. त्यामुळे गडकरींनी एक लेटर बॉम्ब अकोल्यातील स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींना पण द्यावा, अशी अपेक्षा पुंडकर यांनी व्यक्त केली आहे
सेनेने बांधकाम विभागास वेठीस धरले
अकोल्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी तर बांधकाम विभाग वेठीस धरला आहे, याबद्दल देखील गडकरींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून भाजप काय आणि शिवसेना काय दोघेही एकाच माळेचे मणी आहेत, असे पत्रात स्पष्ट केले आहे.