केवळ ७५ रुपयांच्या अपमानावरून घडले गाेपाल अग्रवाल हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:17 AM2020-12-29T04:17:42+5:302020-12-29T04:17:42+5:30
अकाेला : बाेरगाव मंजू येथील संजय स्टाेन क्रशरमध्ये एका वाहनावर चालक असलेला सागर काेठाळे याने एक हजार ६७५ रुपयांच्या ...
अकाेला : बाेरगाव मंजू येथील संजय स्टाेन क्रशरमध्ये एका वाहनावर चालक असलेला सागर काेठाळे याने एक हजार ६७५ रुपयांच्या एका भाड्यातील ७५ रुपयांची रक्कम कमी दिल्याच्या कारणावरून व्यवस्थापक गाेपाल अग्रवाल याने काेठाळेचा प्रचंड अपमान करीत शिवीगाळ केल्याने आत्मप्रतिष्ठेला धक्का बसल्याने याचा बदला घेण्यासाठी गाेपाल अग्रवाल यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आराेपीसह चार जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांनी साेमवारी येथे आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.
अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर २६ डिसेंबर रोजी रात्री गिट्टी खदान व्यावसायिक व संजय स्टोन क्रशरचे मालक संजय अग्रवाल यांचे चुलत भाऊ गोपाल हनुमानप्रसाद अग्रवाल (४५, रा. खोलेश्वर) यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हाेती. हा खून कुणी व कशासाठी केला याचा तपास पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेस सपकाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आला. दोन दिवसांत आरोपींना शोधून काढण्यात त्यांना यश आले. बोरगाव मंजू येथील संजय स्टोन क्रशरचे पर्यवेक्षक राजेश बापूराव भांगे (३५, रा. संतनगर, हिंगणा रोड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खुनातील मुख्य आरोपी सागर कोठाळे, विजय अंबादास राठोड (२४, रा. कातखेडा), लखन वसंता राठोड (२१, रा. कुंभारी), रणधीर भारत मोरे (२३, ता. राहुलनगर, शिवणी) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३९४, ३३४ सह कलम ३/२५, ५/२७(१), ७/२७(३) आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली. जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींपैकी कुणावरही यापूर्वी कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले. सागर काेठाळे याला अपमानाचा बदला घ्यायचा हाेता, तर इतर तीन साथीदारांना त्याने पैशाचे आमिष दिले हाेते. त्यामुळे या तीन जणांनी त्याला साथ दिल्याची माहिती आहे. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेस सपकाळ उपस्थित होते. घटनेत लुटलेले दीड लाख व खुनासाठी वापरण्यात आलेल्या देशी कट्ट्याचा पोलीस शोध घेत आहेत.
..................
बाेरगाव मंजूपासूनच केला पाठलाग
गाेपाल अग्रवाल यांच्यासाेबत असलेले राजेश भांगे याने दिलेल्या तक्रारीनुसार ते व गोपाल अग्रवाल हे घटनेच्या दिवशी बोरगाव मंजू येथून मोटारसायकलने अकोल्याकडे येत असताना सागर कोठाळे याने विजय राठोडसोबत मोटारसायकलवर पाठलाग करून राष्ट्रीय महामार्गावर अप्पू पॉइंटजवळ मोटारसायकल अडवली व सागर काठोळेने अग्रवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. तेथून अग्रवाल यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र आरोपीने पाठलाग करून त्यांच्यावर पुन्हा गोळी झाडली व दगडाने डोक्यावर वार करून ठार करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत भांगे यांनी या घटनेची माहिती सहकाऱ्यांना फोनवरून दिली होती. त्यामुळे गाडीने काही सहकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पोलिसांना माहिती देऊन जखमी अग्रवाल यांना खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
.................
सागरच्या मनात हाेता हत्येचा कट
मुख्य आरोपी सागर याला ७५ रुपयांच्या कारणावरून कामावरून दोन महिन्यांपूर्वी कमी केले हाेते, तर या वेळी गाेपाल अग्रवाल यांनी सागरचा अपमान करीत त्याच्या आत्मप्रतिष्ठेला धक्का पाेहाेचवला हाेता. त्याचा राग मनात ठेवून त्याने अग्रवाल यांचा काटा काढण्यासाठी कट रचला होता. या कटात त्याने इतर तीन आरोपींना पैशांचे आमिष दाखवून सामील केले. लुटमारीच्या उद्देशाने त्याने इतर तिघांना या कटात सामील केले होते. अग्रवाल यांचा खून करणार आहे याबाबत इतर तीन आरोपी अनभिज्ञ होते. या तीन आरोपींपैकी अग्रवाल यांच्याबाबत माहिती पुरवण्याचे काम रणधीर मोरे याने पाळत ठेवून केले. मोरेनेच घटनेच्या दिवशी अग्रवाल व भांगे रोकड घेऊन मोटारसायकलने निघाल्याची माहिती फोनवरून सागर काठोळेला दिली होती. इतर तिघांना कटात सामील करताना लुटमार करणार असल्याचे सांगितल्याने घटनेच्या दिवशी अग्रवाल यांच्याकडे असलेली दीड लाखांची रोकड ठेवलेली बॅग आरोपीने पळवली होती.
.........................
वाढदिवसाच्या दिवशीच दुपारचे हाेते प्लॅनिंग
गोपाल अग्रवाल यांचा २६ डिसेंबरला वाढदिवस होता. याच दिवशी दुपारी गाेपाल अग्रवाल हे खदानीवर त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर गाेळ्या झाडून हत्या करण्याचे प्लॅनिंग सागर काेठाळे याचे हाेते, अशी माहिती आता समाेर आली आहे. मात्र त्या ठिकाणी मारण्याची सागरची हिंमत न झाल्याने इतरांना लुटमारीच्या कटाचे नियाेजन सांगत त्यांना सहभागी करून घेऊन त्याच दिवशी रात्री गाेळ्या झाडून हत्या केली.
आरोपींनी त्या दिवशी अग्रवाल यांना खदानीवर जाऊन शुभेच्छाही दिल्या होत्या. कामगार व खदान मालकांनी दिलेली भेटवस्तूही त्यांच्यासोबत होती.
..............
शस्त्र खरेदी अन् सरावही केला!
आरोपीने अग्रवाल यांचा खून करण्यासाठी कट रचल्यानंतर महिनाभरापूर्वी शस्त्र खरेदी केले होते. त्यानंतर एमआयडीसी परिसरातील एका बंद कारखान्यात त्यांनी बंदूक चालविण्याचा सरावही केला असल्याची माहिती आहे. हे शस्त्र आरोपीने कुठून खरेदी केले व त्यांना बंदूक चालवण्यास कुणी शिकवले याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.