भक्तिमय वातावरणात ‘श्रीं’चा प्रकटोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:01 PM2020-02-16T13:01:37+5:302020-02-16T13:01:47+5:30
महाआरतीनंतर सायंकाळी शहरातील काही भागामध्ये मोठ्या भक्तिभावात ‘श्रीं’ची पालखी काढण्यात आली.
अकोला : संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवानिमित्त शनिवारी आयोजित विविध कार्यक्रमांमुळे राजराजेश्वरनगरीत सकाळपासूनच भक्तिमय वातावरण होते. दिवसभर महाप्रसाद अन् महाआरतीनंतर सायंकाळी शहरातील काही भागामध्ये मोठ्या भक्तिभावात ‘श्रीं’ची पालखी काढण्यात आली.
संत गजानन महाराज प्रकटदिनी शनिवारी सकाळपासूनच शहरात विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. गजानन महाराज मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शहरातील मुख्य चौकांमध्ये ‘श्रीं’च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. शिवाय, गजानन महाराजांच्या भक्तिगीतांनी शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सकाळपासूनच गजानन महाराज मंदिरात महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. सायंकाळी जुने शहरातील शिवनगर परिसरातून मोठ्या हर्षोल्हासात संत गजानन महाराजांची पालखी काढण्यात आली होती. तत्पूर्वी गजानन महाराज मंदिरात ‘श्रीं’ची महाआरती करण्यात आली. महाआरतीला शेकडो भाविकांची उपस्थिती होती. पालखीमध्ये वृद्धांसह चिमुकल्यांनीही उत्साहात सहभाग घेतला होता.
‘श्रीं’च्या मंदिराची आकर्षक सजावट
प्रकट दिनानिमित्त शहरातील विविध भागातील गजानन महाराज मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. डाबकी रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. यावेळी शेकडो भाविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
चौका-चौकांत पालखीचे स्वागत
जुने शहरातून काढण्यात आलेल्या ‘श्रीं’च्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महिलांनी पालखी मार्गावर रांगोळी काढून पुष्पवृष्टी केली. पालखीत सहभागी वारकऱ्यांसाठी परिसरातील नागरिकांकडून शीतपेय आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले.