पोलीस पोहोचण्यापूर्वीच जुगारी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 09:40 AM2020-09-28T09:40:37+5:302020-09-28T09:40:49+5:30
जुगार माफियांनी पूर्ण अड्डाच खाली करून घेतल्याने पोलिसांच्या हातात काहीही न लागल्याने पथक खाली हातच परतले.
अकोला : जुगार माफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या अन्सार व लड्डा या दोघांचे जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक व पोलिसांनी शनिवारी छापेमारी केली; मात्र पोलिसांच्या कारवाईची आधीच कुणकुण लागलेल्या जुगार माफियांनी पूर्ण अड्डाच खाली करून घेतल्याने पोलिसांच्या हातात काहीही न लागल्याने पथक खाली हातच परतले. वर्षानुवर्षांपासून खुलेआम तसेच शंभर ते दीडशे लोकांचा एकाच ठिकाणी जुगार अड्डा सुरू असतानाही पोलिसांना काहीही न मिळाल्याने पोलिसांचे खबरे तसेच त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्याच आशीर्वादाने जुगार माफिया अन्सार व लड्डा या दोघांचे मोठे जुगारअड्डे खुलेआम सुरू असल्याची चर्चा पोलिसातच आहे; मात्र या गंभीर जुगार अड्ड्यांची माहिती व तक्रारी वरिष्ठ स्तरावर पोहोचल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक व पोलिसांनी शनिवारी जुगार माफिया अन्सार व लड्डा या दोघांच्या जुगार अड्ड्यांवर धाव घेतली; मात्र पोलीस येण्यापूर्वीच जुगार अड्ड्यामधील सर्व जण पसार झाल्याने जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या हातात काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही जुगार अड्ड्यांमधील साहित्य जमा करून तेथेच जाळले. खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांची रेड पडताच कुणीही न सापडल्याने ही रेड होण्यापूर्वीच जुगार माफियांना माहिती मिळाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. यावरून सदर जुगार अड्ड्यांवर कारवाई होण्यापूर्वी पोलिसांनीच माहिती लीक केल्याने त्यांचीच मिलीभगत असल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळेच पोलिसांना कारवाई न करताच खाली हात परतावे लागण्याचे वास्तव आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दगडफेक
डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठबळाने जुगार माफिया अन्सार व लड्डा यांचा जुगार अड्डा खुलेआम सुरू असतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांनी पथकासह या दोन्ही जुगार अड्ड्यांवर छापेमारी केली असता तेथील जुगाऱ्यांनी पोलीस अधीक्षक भामरे यांच्यासह त्यांच्या पथकावर दगडफेक करीत मारहाण केली होती. त्यानंतर हे जुगार अड्डे बंद करण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले; मात्र त्यानंतरही हे दोन जुगार अड्डे सुरूच आहेत. यावरून पोलिसांवर जुगार माफिया भारी असल्याचे दिसून येत आहे. आता नवे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या कार्यकाळात तरी हे जुगार अड्डे बंद होतील का, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.