क्रीडा प्रबोधिनीत सरळ प्रवेशाकरिता खेळनिहाय चाचण्या
By Admin | Published: June 25, 2017 01:56 PM2017-06-25T13:56:13+5:302017-06-25T13:56:13+5:30
क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी व अनिवासी प्रवेशाकरिता खेळनिहाय चाचण्याचे आयोजन राज्य स्तरावर करण्यात आले आहे.
अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखाली शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत राज्यातील ११ क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश देण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी व अनिवासी प्रवेशाकरिता खेळनिहाय चाचण्याचे आयोजन राज्य स्तरावर करण्यात आले आहे. यामध्ये अँथलेटिक्स, ज्युडो, शुटिंग, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, फुटबॉल, कुस्ती, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, आर्चरी, हॅण्डबॉल या खेळातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी चाचणी घेण्यात येणार आहे. २८ जून रोजी शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे अँथलेटिक्स, जलतरण, जिम्नॅस्टिक, ट्रायथलॉन, ज्युडो, बॉक्सिंग, सायकलिंग, कुस्ती खेळांची चाचणी घेण्यात येईल. २९ जून रोजी शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी येथेच हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, शुटिंग, वेटलिफ्टिंग खेळांची चाचणी होईल, तर आर्चरी खेळाची चाचणी २९ जून रोजी विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे होईल. दोन्ही दिवस चाचण्यांना सकाळी ८ वाजता प्रारंभ होईल. सरळ प्रवेशाकरिता जे खेळाडू महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत, तसेच राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय, क्रमांकाने विजयी झाले आहेत, अशा १७ वर्षांखालील खेळाडू सरळ प्रवेश प्रक्रियेकरिता पात्र आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई क्रीडांगण येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. (क्रीडा प्रतिनिधी)