गणरायाचे आज आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:31 AM2017-08-25T00:31:30+5:302017-08-25T00:31:30+5:30
विघ्नहर्त्या गणरायाचे शुक्रवारी वाजत-गाजत आगमन होणार असून भाविक श्रींच्या आगमनासाठी उत्सुक झाले आहेत. जिल्ह्यात जवळपास ३ हजार श्रींची सार्वजनिक स्थापना होणार असून यात नांदेड शहरात ४५५ श्रींची स्थापना होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विघ्नहर्त्या गणरायाचे शुक्रवारी वाजत-गाजत आगमन होणार असून भाविक श्रींच्या आगमनासाठी उत्सुक झाले आहेत. जिल्ह्यात जवळपास ३ हजार श्रींची सार्वजनिक स्थापना होणार असून यात नांदेड शहरात ४५५ श्रींची स्थापना होणार आहे.
मागील आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसाने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बळीराजा काही प्रमाणात सुखावला आहे. त्यात मागील आठवड्यापासून श्रींच्या आगमनाची तयारी केली जात आहे. दोन दिवसापासून बाजारपेठा फुलल्या आहेत. श्रींची मूर्ती, धार्मिक विधीचे साहित्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थीला श्रींची स्थापना होणार असून जवळपास ३ हजार ठिकाणी श्रींची स्थापना होणार आहे. नांदेड शहरातील सहा पोलिस ठाण्यांतर्गत ४५५ आणि उर्वरीत ३० पोलिस ठाण्यांतर्गत २ हजार ५४० श्रींची स्थापना होणार आहे.
गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यात एक पोलिस अधीक्षक, दोन अप्पर पोलिस अधीक्षक, ९ उपअधीक्षक, ४० पोलिस निरीक्षक, २५५ सहाय्यक, उपनिरीक्षक तसेच जवळपास ३ हजार पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.
राज्य राखीव पोलिस दलाच्या एका तुकडीसह ८ दंगा नियंत्रण पथकेही कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेशोत्सव बंदोबस्ताकरिता एक हजार पुरुष होमगार्ड व २०० महिला होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव व बकरी ईद अनुषंगाने शांतता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून कलम १०७ नुसार २५८३, कलम ११० नुसार ३६९, कलम १४४ नुसार १३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातून ६३ जणांच्या हद्दीपारीचे प्रस्ताव दिले होते. त्यातील १९ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. दारुबंदी कायद्याखालीही जिल्ह्यात अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली असून १७५ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये १२ लाख ९९ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार खेळणाºयावरही कारवाई केली असून २९ गुन्ह्यात ४ लाख ७८ हजार ७५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सव कालावधीत जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले आहे.
दरम्यान, गणपती उत्सवानिमित्त उकडीचे मोदक, खव्याचे मोदक, रव्याचे मोदक, गुळाचे मोदक विक्रीस आले आहे. याबरोबरच गुलाब, जास्वंद ही फुले गणपतीला प्रिय असल्याने या फुलांची मागणी वाढली आहे. गणपतीसमोर आरास मांडण्यासाठी थर्माकोलपासून बनविलेल्या विविध वस्तू, फोल्डींगची मंदिरे बाजारात विक्रीस आल्याचे दिसून आले.