‘गणपती बाप्पा मोरया’, गणरायाचे थाटात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:20 AM2021-09-11T04:20:17+5:302021-09-11T04:20:17+5:30
काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहे; मात्र तिसऱ्या लाटेचा धोका पाहता यंदाही धार्मिक उत्सव, ...
काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहे; मात्र तिसऱ्या लाटेचा धोका पाहता यंदाही धार्मिक उत्सव, इतर जाहीर कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. शासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून, दर्शनही ऑनलाइन घेता येणार आहे. शहरात कावड-पालखी उत्सवाची परंपरा खंडित न हाेता ताे साजरा करण्यात आला. याच पृष्ठभूमीवर शुक्रवारी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले; मात्र गणेश भक्तांचा उत्साह कायम हाेता. मूर्ती घेण्यासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. बाप्पाच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली हाेती.
नो मास्क, नो फिजिकल डिस्टन्स
शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शुक्रवारी गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी बहुतांश नागरिकांनी मास्क घातले नसल्याचे निदर्शनास आले. तर फिजिकल डिस्टन्सिगही पुरेसा फज्जा उडाल्याचे चित्र होते. हीच स्थिती जठारपेठ, जयहिंद चौक, डाबकी रोड, रणपिसे नगर, गांधी रोड या ठिकाणीही दिसून आली.
‘बालगणेश’, मातीच्या मूर्तीला पसंती
गणरायाची स्थापना करण्यासाठी यंदा नागरिकांनी विघ्नहर्त्याच्या लहान मूर्तींना पसंती दिल्याचे दिसून आले. गणेश भक्त मातीच्या मूर्तींची मागणी करीत हाेते. तर बहुतांश गणेश भक्तांकडून बालगणेशला मागणी होती.
सजावटीचे साहित्य खरेदीसाठी झुंबड
कोरोनाच्या काळातही शुक्रवारी भक्तांनी लाडक्या बाप्पाच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. हार, ताेरण, आकर्षक विद्युत दिव्यांची माळ, थर्माकाॅलचे मखर, गुलाल, पूजेचे इतर सजावटीचे साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
...तरीही पोलिसांचे दुर्लक्ष
अकोला क्रिकेट क्लब मैदानात दररोज पोलिसांची तैनाती करण्यात येत आहे. तरीदेखील या ठिकाणी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत होते; मात्र या सर्व प्रकाराकडे येथे तैनात पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.