रोपे तयार करणाऱ्या हातांनी घडविले गणपती बाप्पा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:37 PM2018-08-19T14:37:08+5:302018-08-19T14:41:01+5:30
अकोला : सामाजिक वनीकरण, वन व वन्यजीव विभागातील कर्मचारी वर्ग नेहमीच वृक्ष रोपे तयार करीत असतो. याच हातांनी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती घडविण्याचे काम केले.
अकोला : सामाजिक वनीकरण, वन व वन्यजीव विभागातील कर्मचारी वर्ग नेहमीच वृक्ष रोपे तयार करीत असतो. याच हातांनी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती घडविण्याचे काम केले. १६ आॅगस्ट रोजी कर्मचाºयांसाठी गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती.
समृद्ध पर्यावरणासाठी व प्राणवायूसाठी झाडांची गरज असते. यासाठी वृक्षारोपण करावे लागते व वृक्षारोपणासाठी रोपे तयार करण्याचे काम सामाजिक वनीकरण विभाग सातत्याने करीत असते. नर्सरी तयार करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे व वृक्ष लागवड करणे हे या विभागाचे कार्य आहे. यासोबतच विभागातील कर्मचाºयांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तीनही विभागाचे इच्छुक महिला, पुरुष कर्मचाºयांनी स्वहस्ते पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या. जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची चळवळ सुरू करणारे अमोल सावंत व निसर्ग कट्टाचे प्रेम अवचार, आनंद पाचरे, शिवा इंगळे, मनोज रुद्रकार व अभय साखरकर यांनी कर्मचाºयांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत अधिकाºयांपासून वनमजुरांपर्यंत सर्वच सहभागी झाले होते. प्रत्येकाने साध्या व सोप्या पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची निर्मिती केली. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी विजय माने यांच्या संकल्पनेतून बीज गणेशमूर्तीची निर्मिती करण्यात आली. विविध झाडांच्या बियांच्या माध्यमातून या गणेशमूर्ती सजविण्यात आल्या होत्या. कार्यशाळेत सामाजिक वनीकरण विभागाच्या एसीएफ आदे, वन्यजीव विभागाचे एसीएफ गाढे, अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी कातखेडे, नम्रता टाले यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)