अकोल्यात गणरायाची जल्लोषात मिरवणूक, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
By नितिन गव्हाळे | Published: September 28, 2023 05:18 PM2023-09-28T17:18:39+5:302023-09-28T17:18:48+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणपती बाप्पाची थाटात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील १४६ गणेशोत्सव मंडळे वाजतगाजत सहभागी झाले होते.
अकोला : गणपतीबाप्पा चालले गावाला...चैन पडेना आम्हाला...अशा लाडक्या गणरायाचे १० दिवस आदरातिथ्य करून २८ सप्टेंबरला लाडक्या बाप्पाला अकोलेकर भाविकांनी...गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशी विनवणी करीत, जड अंत:करणाने निरोप दिला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास जुने शहरातील जय हिंद चौकातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. काही गणपती मिरवणुकीतून गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर रवाना झाले.
शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणपती बाप्पाची थाटात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील १४६ गणेशोत्सव मंडळे वाजतगाजत सहभागी झाले होते. यंदा साऊंड सिस्टीमऐवजी ढोल-ताशांसह दिंडी पथकावर गणेश मंडळांनी भर दिला. मिरवणुकीला सकाळी ११ वाजता प्रारंभ करण्यात आला तरी दुपारी २ वाजेपर्यंत केवळ ४४ गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती. विसर्जन मार्गावर दुपारी ५ वाजेपर्यंत गर्दीही कमी होती. सायंकाळी सहानंतर मिरवणुकीमध्ये इतर गणेश मंडळांच्या वाहनांनी प्रवेश केला. ढोल-ताशांचा गजर....दिंडी पथकाचे ढोल व बासरीचा निनाद...फटाक्यांची आतषबाजी, गुलाल, फुलांची उधळण....बाप्पा मोरयाच्या गजराने शहरातील वातावरण नादमय झाले होते.
जय हिंद चौकात मानाच्या बाराभाई गणेशासह राजराजेश्वर मंडळ, जागेश्वर गणेश मंडळ, खोलेश्वर गणेश मंडळाच्या गणरायांचे स्वागत आणि पूजन करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक श्रीवास्तव चौक, अगरवेस मार्गे दगडीपूल, रायली जिनमार्गे टिळक रोडवर पोहोचली. ठिकठिकाणी भाविकांनी मिरवणुकीचे स्वागत केले. माळीपुरा चौकातून मिरवणूक रेडक्रॉस सोसायटीच्यासमोर पोहोचली. याठिकाणी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बाराभाई गणेशाचे पूजन केले. यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे मानद् सचिव प्रभजितसिंह बछेर उपस्थित होते. त्यानंतर मिरवणूक सुभाष चौक, तेलीपुरामार्गे ताजनापेठ, मोठ्या मशिदीसमोरून मार्गक्रमण करीत, जैन मंदिराजवळ पोहोचली. गांधी चौकात मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी, एसपींकडून महाआरती
जय हिंद चौकात मानाच्या बाराभाई गणपतीच्या पालखीचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पूजन करून महाआरती केली.
गणेशोत्सव मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत गुरूवार २८ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी पाहावयास मिळाली.