मनपा विरोधी पक्षनेत्यांची गांधीगिरी; लघू व्यावसायिकांवरील कारवाईचा केला निषेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:14 PM2019-05-21T12:14:18+5:302019-05-21T12:14:28+5:30
मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी सोमवारी गांधी रोडवर कपड्यांची विक्री करीत मनपा प्रशासनाच्या कारवाईचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला.
अकोला: गांधी रोडवरील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना अट्टहासापोटी गणेश घाटावर हुसकाविण्याचे प्रयत्न मनपाकडून होत असल्याने ऐन रमजानसारख्या सणासुदीच्या दिवसांत त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. मनपाने तयार केलेली नियमावली सर्वांना लागू करा, केवळ गांधी रोडवरील लघू व्यावसायिकांवर जबरदस्ती करू नका, असे सांगत मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी सोमवारी गांधी रोडवर कपड्यांची विक्री करीत मनपा प्रशासनाच्या कारवाईचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला.
शहरातील गांधी रोड, टिळक रोड, जुना भाजी बाजार, मोहम्मद अली रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज आदी अत्यंत गजबजलेल्या मुख्य मार्गांवर लघू व्यावसायिक व फेरीवाले व्यवसाय करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजंूनी लघू व्यावसायिक दुकाने उभारत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून राज्य शासनाने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे महापालिकेला निर्देश दिले आहेत. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी शासन स्तरावर मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर महापालिकेने केल्यानंतर शहरातील मुख्य मार्गांवर सुमारे १८०० पेक्षा जास्त लघू व्यावसायिक-फेरीवाले व्यवसाय करीत असल्याचे चित्र समोर आले. महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी पुढाकार घेत संबंधित लघू व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. गांधी रोड, काश्मीर लॉज, टिळक रोड, जनता भाजी बाजार आदी भागातील व्यावसायिकांना मुख्य गणेश घाटावर पर्यायी जागा देण्यासाठी नियोजन करण्यात आले. मागील काही दिवसांपासून केवळ गांधी रोडवरील लघू व्यावसायिकांना गणेश घाटावर हलविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. मनपाने इतर ठिकाणच्या लघू व्यावसायिकांना अभय दिले असून, गांधी रोडवरील व्यावसायिकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी प्रशासनाच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकविल्याचे दिसत आहे.
आधी वरली अड्डे बंद करा त्यानंतर...
सोमवारी सकाळी विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गांधी रोड परिसरात लघू व्यावसायिकांनी दुकाने थाटली. यावेळी अतिक्रमण विभाग व सिटी कोतवाली पोलिसांनी लघू व्यावसायिकांना हुसकाविण्याचा प्रयत्न केला असता, आधी शहरातील वरली, मटका, जुगार आदी अवैध धंदे बंद करा, त्यानंतर इमानदारीने पोट भरणाऱ्या व्यावसायिकांना हटवा, असे सांगत साजीद खान यांनी सिटी कोतवाली पोलिसांना त्यांच्या कर्तव्याप्रती आरसा दाखविला.
मनपाने संपूर्ण शहरातील लघू व्यावसायिकांची माहिती गोळा केली असून, त्यांना पर्यायी जागा देण्याचे नियोजन केले आहे. ऐन रमजानसारख्या सणासुदीच्या दिवसांत फक्त गांधी रोडवरील व्यावसायिकांना हटविण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल उपस्थित होतो. मनपाने सर्वांना समान न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा आहे. सणासुदीच्या दिवसांत शहरातील कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, यावर मनपाने विचार करावा.
- साजीद खान पठाण, विरोधी पक्षनेता मनपा.