गांधीजींच्या सभेमुळे संचारले होते नवचैतन्य
By Admin | Published: October 2, 2016 02:17 AM2016-10-02T02:17:07+5:302016-10-02T02:17:07+5:30
स्वातंत्र्यलढय़ात अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील ग्रामस्थांनी नोंदवला होता सहभाग.
राहुल सोनोने
वाडेगाव(जि. अकोला), दि. 0१- भारताला ब्रिटिशांच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांना मार्गदर्शन केले होते. त्यांची एक सभा १९३३ मध्ये वाडेगावातही झाली होती. या सभेनंतर युवकांमध्ये नवचैतन्य संचारले होते.
वाडेगावातील धनजीभाई ठक्कर हे मुंबईला महात्मा गांधी यांच्या भाषणाला उपस्थित होते. तेथील ते भाषण त्यांना पसंत पडले व तरुणांनो तुम्ही खेड्यामध्ये जा आणि स्वातंत्र्याचे वारे पसरवा, असा संदेश त्या भाषणातून महात्मा गांधींनी युवकांना दिला होता. महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद धनजीभाई ठक्कर यांनी प्रतिसाद दिला. वाडेगावातून ११0 लोकांनी स्वातंत्र्याचा लढा देताना शिक्षा भोगली होती. ही माहिती धनजीभाई ठक्कर यांनी महात्मा गांधींना सांगितली होती व महात्मा गांधी यांना वाडेगावात येण्यासाठी विनंती केली होती. १९३३ साली महात्मा गांधी यांची विदर्भाची बारडोली म्हणून ओळखल्या जाणार्या वाडेगावात निगरुणा नदीच्या पात्रामध्ये रेतीच्या टेकडीवर मोठी सभा बोलविण्यात आली होती. त्यांच्या स्वागतासाठी वाडेगाववासीयांनी बेसिक शाळेपासून ते जागेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूपर्यंंत केळीच्या बन लावल्या होत्या. त्यावेळी गांधीजींच्या सभेला परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या सभेचे अध्यक्ष धनजीभाई ठक्कर हे होते. या सभेत महात्मा गांधी यांनी हिंदीमधून भाषण दिले होते. या भाषणामुळे स्वातंत्र्य सैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. गांधीजींनी यावेळी तुम्ही या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी व्हा, असे आवाहन युवकांना केले होते. अकोल्यातील नेते ब्रिजलाल बियाणीसुद्धा या सभेला उपस्थित होते. त्यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले होते. महात्मा गांधींनी या ठिकाणी ४५ मिनिटे भाषण केले होते. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचे गाव बारडोली असलेल्या गावामधून मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्य सैनिक तयार झाले होते. ती बारडोली म्हणजे देशाची बारडोली म्हणून ओळखली जायची म्हणून या वाडेगावला विदर्भाची बारडोली नाव दिले होते. ह्यस्वराज तो आनेवालाही है, अपने देश में अपना राज होना. ये लोग व्यापार करने के लिए अपने देश में आए है. स्वराज मिलने के लिए इसमें शामील हो आवोह्ण, असे आवाहन गांधीजींनी यावेळी केले होते.