यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या गणेशमूर्तीची क्रेझ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:27 PM2019-08-18T15:27:33+5:302019-08-18T15:31:21+5:30
शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने शाडूच्या मूर्तीकडे भाविक वळत आहे.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो, ती माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून पर्यावरणप्रेमींनी मातीचा गणपतीची स्थापना करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या तरी शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने शाडूच्या मूर्तीकडे भाविक वळत आहे. तर काही घरीच मूर्ती बनविण्याच्या तयारीला लागले आहेत; पण शाडू म्हणजे नेमके काय, ती कुठे मिळते, कशी तयार होते, याबाबत अजूनही सामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो.
शाडूचा शब्दश: अर्थ म्हणजे पांढºया रंगाची चिकण माती. शाडू माती ही गुजरातच्या पोरबंदर येथून देशभरात विक्रीस जाते. या मातीची मागणी जास्त असून, पुरवठा कमी आहे. त्यामुळे मूर्तीचे उत्पादन कमी होत असल्याने त्याच्या किमती प्लास्टरच्या तुलनेत जास्त असतात. समुद्रातील खडकापासून शाडू माती तयार केली जाते. हा दगड गिरणीत दळला जातो. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात शाडू मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. येथील गणपतीच्या मूर्ती जगभरात जातात.
अनेकदा बाजारात शाडू मातीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक होते. शाडूऐवजी फायर क्ले अर्थात वीटभट्ट्यांवर असणाºया मातीचा वापर होतो. कमी किंमत व मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाºया या फायर क्लेद्वारे मूर्ती बनविताना श्वसनाचे आजार जडतात. शिवाय मूर्तीला तडे जातात. गणपती घरी बनविणाऱ्यांना शाडू बरेचदा उपलब्ध होत नाही. अशा वेळी लाल माती, काळी माती, भस्म्या मुरू म, कंपोस्ट खत एकत्र करू न तयार झालेल्या मातीत बीज टाकून अंकुर गणपती साकारल्या जाऊ शकतो.
अकोल्यात अशी पोहोचते शाडू
अकोल्यामध्ये राजस्थान व मध्यप्रदेशातून शाडू माती आणल्या जाते. तेलीपुरा येथे असलेल्या ठोक विक्रेत्यांकडून शहरातील इतर दुकानांमध्ये ही माती पोहोचते. १८ ते २० रुपये किलो दराने ही माती ग्राहकांना उपलब्ध होते. तसेच आॅनलाइन खरेदी करणाºयांसाठी आॅनलाइन शॉपिंग अॅपवर शाडू क्ले उपलब्ध आहेत.
शाडू मूर्ती कशी ओळखायची
शाडू मूर्ती वजनाला जड असते. आतमधून पोकळ नसते. एका साच्यात तयार झालेली नसते; परंतु मूर्तीचा ढाचा मजबूत असतो. मूर्तीचा रंग चमकदार नसतो.
शाडू मूर्ती कार्यशाळा
घरोघरी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना व्हावी, यासाठी मागील दोन-चार वर्षांपासून ठिकठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. पर्यावरणप्रेमी यामध्ये विद्यार्थी, गृहिणी, हौशी कलावंतांना शाडूपासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देतात. आपल्या हाताने आपल्या बाप्पांची मूर्ती बनविल्याबद्दल भाविकांना वेगळाच आनंद होतो.
बाजारात मूर्ती उपलब्ध
शाडूच्या मूर्ती गणेशोत्सवात गणपती विक्रीकरिता भरण्यात येणाऱ्या बाजारात उपलब्ध असतात. पीओपीच्या मूर्तींपेक्षा या मूर्ती महाग असतात. अकोल्यात मागील वर्षी हजारच्या जवळपास शाडूच्या मूर्ती विकल्या गेल्या.
शासनाने सहकार्य करावे
धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्ती बनविणे आवश्यक आहे. प्रतिदिन सहस्त्रो टन माती खाणीतून काढली जाते. वर्षातून गणेशोत्सवापूर्वी १० ते १५ टन माती काढली, तर पर्यावरणाची मोठी हानी होत नाही. शासनाने सर्वोतोपरी सहकार्य केल्यास केवळ शाडू मातीच्याच मूर्ती तयार करण्यास मूर्तिकारांना अडचण येणार नाही.