नियमांच्या कोंदणात साजरा होणार गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:14+5:302021-09-09T04:24:14+5:30
कोरोना गेलेला नाही, त्यामुळे यंदाही सर्व नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. उत्सव साध्या पद्धतीने होणार असला, ...
कोरोना गेलेला नाही, त्यामुळे यंदाही सर्व नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. उत्सव साध्या पद्धतीने होणार असला, तरी उत्साह व श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. पर्यावरणाची जाण ठेवत यंदा सर्व गणेश मंडळांनी आपल्या परिसरात किमान दहा वृक्ष लावून त्यांचे दहा वर्ष संगोपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिद्धार्थ शर्मा, महासचिव, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अकोला
शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच यंदा गणेशोत्सव साजरा करणार आहोत. सामाजिक प्रबोधनावर भर देऊन व्हाॅट्सॲप ग्रुपद्वारे लोकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती सुरु केली आहे. आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे लसीकरण झाले असून, आरटीपीसीआर चाचण्याही केलेल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान मंडप व परिसरात सॅनिटायझेशनही करण्यात येणार आहे.
चंद्रकांत बाेराखडे, अध्यक्ष, श्री तेलीपुरा गणेशोत्सव मंडळ, तेलीपुरा, अकोला
यावर्षीही कोरोनाचे सावट असल्याने उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच सर्व सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. उत्साह कुठेही कमी झालेला नाही. मंडळाच्यावतीने सामाजिक प्रबोधन करणारे पोस्टर्स तथा कोरोनाबाबत जनजागृत करणारे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत.
मोहन मानकर, अध्यक्ष, श्री महाराना प्रताप गणेशोत्सव मंडळ, डाबकी रोड, अकोला
कोरोनापूर्वी आमच्या मंडळाकडून रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर यासारखे उपक्रम होत असत. गत वर्षीपासून शासनाच्या नियमानुसार साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहोत. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करूनच दहा दिवस भक्तिभावाने श्रींची पूजा करून उत्सव साजरा केला जाणार आहे.
गजेंद्र ढवळे, संचालक, माळीपूरा एकता गणेशोत्सव मंडळ, अकोला
अटी, शर्तींचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. पर्यावरणाचा ढासळता समतोल कामय राहवा यासाठी झाडे लावणे व जगविणे गरजेचे आहे. हा संदेश देण्यासाठी मंडळाच्या वतीने परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम आम्ही राबविणार आहोत.
मनीष हिवराळे, अध्यक्ष, तरुण समाज गणेशोत्सव मंडळ, अकोला