शेतीमाल खरेदी करणारी बनावट व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:56+5:302021-06-26T04:14:56+5:30
बबन इंगळे बार्शीटाकळी : बळीराजाने शेतात घाम गाळून पिकविलेला शेतीमाल जादा भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून व विश्वासात घेऊन ...
बबन इंगळे
बार्शीटाकळी : बळीराजाने शेतात घाम गाळून पिकविलेला शेतीमाल जादा भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून व विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी बार्शीटाकळी तालुक्यात गेल्या वर्षापासून सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या टोळीचा प्रताप नुकताच उघडकीस आला असून, प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील ४० शेतकऱ्यांकडून सोयाबीन, कापूस व हरभरा जादा भावाच्या आमिषाने खरेदी केला. काही कालावधीनंतर चूकारे करतो, असे सांगून शेतातूनच शेतीमाल मोजमाप करून घेऊन गेल्याचा प्रकार पोलीस विभागाला दिलेल्या तक्रारीतून उघडकीस आला आहे.
तालुक्यातील काजळेश्वर येथील शेतकरी गणेश नानोटे, नारायण राठोड, रामराव राठोड, घन:श्याम जाधव, मनोज नानोटे, ओमप्रकाश जाधव, हिम्मत राठोड, ओमप्रकाश नानोटे, महादेव नानोटे, गणेश नानोटे, रोहिदास राठोड, मारुती नानोटे, रामकिसन राठोड, भीमराव नानोटे, किसन नानोटे, ब्रम्हानंद राठोड, सहदेव नानोटे, लक्ष्मण जाधव, विनायक राठोड, पवन आवटे, दत्ता बोबडे, प्रमिला जाधव, वनिता राठोड, कमला चव्हाण, बाळू नानोटे, गणेश रामराव नानोटे आदी शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल तालुक्यात बनावट व्यापारी बनून फिरणारे संदीप रमेश राठोड, बाळू प्रल्हाद राठोड, गोपाल बाबूराव नानोटे, श्रीकांत भास्कर काळे, रवींद्र सहाकर आदींनी घेऊन, लाखोचा गंडा घालून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नुकतीच केली आहे. दोषींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तक्रारीतून केली आहे. असाच प्रकार तालुक्यातील खडकी, धामणदरी येथील गोरसिंग चव्हाण, उमराव चव्हाण, सुनील चव्हाण, सुधाकर चव्हाण, वामन चव्हाण, वसंता राठोड या शेतकऱ्यांसोबत सुद्धा घडल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना सुद्धा १० ते १२ लाख रुपयाचा गंडा घालून त्यांचा शेतीमाल धनादेश देऊन खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.
-------------------------
मी मागीलवर्षी शेतातील सोयाबीन मळणी यंत्राने काढून पोती भरणे सुरू असताना संदीप राठोड याने शेतातच सौदा करून सोयाबीन नेले. परंतु अद्यापही पैसे दिले नसल्याने फसवणूक झाली.
- उमराव चव्हाण, शेतकरी, खडकी.
-------------------
असे करायचे शेतकऱ्यांची फसवणूक...
तालुक्यातील बनावट व्यापारी शेतीमाल काढणी सुरू असताना थेट ओळखीच्या शेतकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या शेतावर जायचे. तेथेच त्यांना सध्या असलेल्या बाजारभावापेक्षा ज्यादा दर देण्याचे आमिष दाखवून शेतातच शेतीमालाची खरेदी करायचे. विश्वासासाठी धनादेश देत होते. ज्या शेतकऱ्यांना पैशाची आर्थिक अडचण नाही, असे शेतकरी यांच्या आमिषाला बळी पडून शेतीमाल देत होते.
------------------------