मोटारसायकली चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी गजाआड
By admin | Published: November 8, 2014 12:18 AM2014-11-08T00:18:54+5:302014-11-08T00:18:54+5:30
अकोल्यातील रामदासपेठ पोलिसांची कारवाई, मुलांकडून तीन मोटारसायकली जप्त.
अकोला : मोटारसायकली चोरणार्या अल्पवयीन मुलांच्या टोळीस रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एकाची कारागृहात तर चार जणांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.
रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या रेल्वे स्टेशन व न्यायालय परिसरातून मोटारसायकली चोरी जाण्याच्या घटना काही दिवसांपासून वाढल्या आहेत. याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यामध्ये मोटारसायकली लंपास झाल्याच्या तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आल्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना काही अल्पवयीन मुलेच मोटारसायकली चोरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली. गुरुवारी पोलिसांनी दीपेश अशोक मोदी (२१) याच्यासह ९ वर्षीय चिमुकल्या मुलासह १२, १३ व १६ वर्षीय मुलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एमएच ३0 एसी ५५६५ क्रमांकाची टीव्हीएस, एमएच ३0 के ८९१३ क्रमांकाची हीरो होंडा आणि एमएच ३0 एफ २९0८ क्रमांकाची स्कुटी जप्त केली. पोलिसांनी बाल गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दीपेश मोदी याची कारागृहात तर इतर चौघांची बाल सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. ही कारवाई एपीआय वैशाली आढाव, रवी इरचे, जय मंडावरे, प्रवीण भोळे यांनी केली.