प्रतिष्ठितांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:50+5:302021-02-24T04:20:50+5:30
अकोला: जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व नोकरी करणाऱ्या नागरिकांना हनी ट्रॅपच्या जाळ्यातून पैसे लुटणाऱ्या टोळीचा खदान व एमआयडीसी पोलिसांनी ...
अकोला: जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व नोकरी करणाऱ्या नागरिकांना हनी ट्रॅपच्या जाळ्यातून पैसे लुटणाऱ्या टोळीचा खदान व एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना गजाआड करण्यात आले.
जिल्हा परिषदेमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेले तेजराव जगदेव नवलकार यांनी तक्रार दाखल केली की, त्यांना 21 जानेवारी रोजी प्रीती थोरात ही युवती फोन करून भेटण्यासाठी बोलवत होती. त्यामुळे नवलकर हे सदर युवतीला भेटण्यासाठी एमआयडीसी परिसरातील अप्पू टी पॉइंट येथे गेले.
यादरम्यान युवती थेट कारमध्ये आली आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागली. यावेळी तीन युवक तेथे येऊन आमच्या बहिणीसोबत छेडखानी केली म्हणून त्यांना मारहाण करू लागले. तसेच प्रकरण निपटण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. सामाजिक बदनामीमुळे तेजराव नवलकर यांनी सदर इसमांना एक लाख रुपये दिले.
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात भादवी 120 बी, 170, 384, 385, 323, 504, 506 नुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. या घटनेत अक्षय चिरांडे हा युवक सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता संतोष यादव, राहुल इंगळे सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.
या हनी ट्रॅपच्या माध्यमातून प्रतिष्ठीत नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये हडप करणारे या टोळीच्या जाळ्यात शहरातील अनेक नामवंत प्रतिष्ठित नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केल्याने अनेक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
सराफा असोसिएशनचे अध्यक्षलाही ओढले जाळ्यात
सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार वर्मा यांच्या मोबाईलवरही एका अज्ञात युवतीने फोन करून त्यांना भेटण्यास विनंती केली. त्यानंतर वर्मा हे गौरक्षण रोडवर तिला भेटण्यासाठी गेले असता युवतीने त्यांना मलकापुरातील एका फ्लॅट वर नेले. त्या ठिकाणी हेच युवक आले आणि युवतीचा विनयभंग केल्याची आरडाओरड केली. यावरून वर्मा यांची तोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या टोळक्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.