दरोडेखोरांची टोळी पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:31+5:302021-05-05T04:31:31+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वाडी व आसलगाव येथील रहिवासी विलास प्रकाश काळे वय ३९ वर्षे, कैलास धुदन पवार ...
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वाडी व आसलगाव येथील रहिवासी विलास प्रकाश काळे वय ३९ वर्षे, कैलास धुदन पवार वय ६० वर्षे, विजय कैलास पवार वय ४० वर्षे, सुरज विजू पवार वय २० वर्षे व शीतल विलास भोसले वय ३८ वर्षे राहणार वाडी व आसलगाव हे पाच जण एमएच ०४ डीएन ४२६ क्रमांकाच्या स्विफ्ट कारमध्ये पातुर रोडवर संशयास्पद हालचाली करीत असताना तसेच दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून विलास पाटील यांनी पथकासह पाळत ठेवून या पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तीन बोटल पारा मर्क्युरी ऑक्साईड, एक बॉटल ॲसिड, एक धारदार शस्त्र, एक दोर, मिरची पावडर, पाच मोबाइल व इतर मुद्देमाल असे एकूण ३ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या पाचही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीकडून अकोल्यात झालेल्या काही घरफोड्या, चोरी व दरोड्यांची माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने बुलढाणा व अकोला जिल्ह्यात अनेक गुन्हे केले असून या गुन्ह्यांची मालिका आता पोलिसांसमोर उघड होणार असल्याची माहिती आहे.