नवजीवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:57 PM2019-09-14T15:57:16+5:302019-09-14T15:57:20+5:30
अमरावती, बडनेरा येथील जीआरपी पोलीस ठाण्यात ९ लाख १३ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
अकोला: नवजीवन एक्स्प्रेमधील वातानुकूलित बोगीमधील प्रवाशांकडील सोने-चांदीसह इतर मौल्यवान वस्तू कुख्यात चोरांनी पळविल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन प्रवाशांच्या तक्रारीवरून अकोला जीआरपी पोलीस ठाण्यात ४७ हजार ४७६ रुपयांच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती, बडनेरा येथील जीआरपी पोलीस ठाण्यात ९ लाख १३ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर नागपूर आणि आणखी दोन ठिकाणच्या जीआरपी पोलिसांकडे प्रवाशांनी त्यांच्याकडील दागिने व रोख पळविल्याच्या तक्रारी केल्याची माहिती आहे.
नवजीवन एक्स्प्रेस क्रमांक १२६५६ चेन्नईवरून अहमदाबादकडे जात होती. गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळीपर्यंत काही कुख्यात चोरट्यांनी या रेल्वेमधील वातानुकूलित बोगीमधील प्रवाशांकडील पैसे, सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली. प्रवाशांनी वस्तंूची चाचपणी केली असता अनेकांच्या किमती वस्तू चोरीला गेल्याचे कळाले. यावरून अनेक प्रवाशांनी विविध जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
अकोला जीआरपी पोलीस ठाण्यात सुरत येथील मोनीषा नारायण भन्साली (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते या एक्स्प्रेमधील एसी बोगीच्या बी-४ या कंम्पार्टमेंटवर बसलेले होते. हिंगणघाट रेल्वे स्थानकाजवळ येत असताना त्यांच्याकडील एक तपकिरी रंगाची लेडीज बॅग चोरी झाली. या बॅगमध्ये २५ हजार रुपये नगदी, दुचाकीचे लायसन्स, ४.३० ग्रॅम सोने किमत १९ हजार ८२६ रुपये, चांदी २० ग्रॅम किंमत ११ हजार १५० रुपये असा एकूण ४७ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या व्यतिरिक्त मालपल्ली येथील रहिवासी चंद्रलेखा नरेंद्र (३१) यांनी बडनेरा जीआरपी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्या एक्स्प्रेसमधील बी-५ मध्ये प्रवास करीत होत्या. मध्यरात्रीदरम्यान ९ लाख १३ हजार ५०० रुपयांचे सोने, नगदी असा मुद्देमाल चोरी झाला. हे प्रकरण वर्धा जीआरपी पोलिसांच्या अंतर्गत झाले असल्याने अकोला, बडनेरा जीआरपी पोलिसांनी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण वर्धा जीआरपीकडे वर्ग करण्यात आले आहे.
रेल्वेतील पोलीस झोपेत
नवजीवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांना रात्रभर लुटल्यानंतरही रेल्वेतील पोलीस दिसले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावरून रेल्वेत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गंभीर नसल्याचे दिसून येते.