फवारणीचे औषध चोरणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 06:13 PM2020-07-15T18:13:03+5:302020-07-15T18:13:19+5:30
फवारणीचे द्रव्य चोरणाऱ्या टोळीतील चार चोरट्यांना अटक करण्यात अकोट पोलिसांना बुधवारी सकाळी यश आले.
अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पाचमोरी परिसरातील गोदामातून एका ट्रकमध्ये भरलेले फवारणीचे द्रव्य चोरणाऱ्या टोळीतील चार चोरट्यांना अटक करण्यात अकोट पोलिसांना बुधवारी सकाळी यश आले. या टोळीतील चोरट्यांकडून फवारणीच्या द्रव्यांसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाचमोरी परिसरात असलेल्या गोदामातून एका ट्रकमध्ये फवारणीचे द्रव्य भरण्यात आले होते. हे द्रव्य बाहेर जिल्ह्यात देण्यात येत होते; मात्र तत्पूर्वी सदरच्या ट्रकचालकाने तो ट्रक सोळाशे प्लॉट येथील त्याच्या घरासमोर उभा केला आणि रात्री झोपी गेला. सकाळी उठून तो बाहेरगावी जाण्याच्या बेतात असतानाच रात्री उशिरा या ट्रकमधील फवारणीचे द्रव्य चोरट्यांनी पळविल्याचे त्याच्या निदर्शनास आले. याप्रकरणी ट्रकचालकाने अकोट फाइल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून फवारणीचे द्रव्य चोरी करणाºया चोरट्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, त्यांना मंगळवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सय्यद सादीक सय्यद मोहिमोद्दीन वय २६ वर्षे, अजरुद्दीन तमीजोद्दीन वय ३० वर्षे, शहबाज खान ऊर्फ शब्या सुलेमान खान वय २५ वर्षे, आकिब जहीर खान वय २८ वर्षे सर्व रा. अकोट फाइल यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अकोट फाइल पोलिसांनी या चारही चोरट्यांची चौकशी सुरू केली असता, त्यांनी ट्रकमधील फवारणीचे द्रव्य चोरल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या जवळून एक लाख ५० हजार रुपये किमतीचे फवारणीचे द्रव्य, एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शहर पोलीस उप-अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट फाइल पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम यांच्या निर्देशाने पीएसआय सुशिर, हरिचंद्र दाते, सुनील टोपकर, शेख असलम, संजय पांडे, छोटू पवार, राहुल चव्हाण, दिलीप इंगोले, श्याम आठवे यांनी केली आहे.