टोळीने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:20 AM2021-03-23T04:20:13+5:302021-03-23T04:20:13+5:30
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश अकोला : अकोला शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक ...
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश
अकोला : अकोला शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे २७ टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चिंतोडा येथील रहिवासी प्रदीप बाबुराव हिवराळे वय ३५ वर्ष, वाडेगाव येथील रहिवासी शेख सलीम शेख अब्दुल्ला वय ४५ वर्ष व शेख युसुफ शेख मुसा वय ४० वर्षे हे तिघे जण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून तिन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता, त्यांनी या तिघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून बाळापूर पोलिसांनी या तिन्ही गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. बाळापूर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या तिघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक, तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र, तीनही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशाने या तीनही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश सोमवारी दिला असून, टोळीला सोमवारपासूनच जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे.