अनोळखी महिलांची टोळी तांब्या-पितळेची भांडी घेऊन पसार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:08+5:302021-08-13T04:23:08+5:30
तांबे व पितळच्या भांड्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. ग्रामीण भागात अशी तांब्या, पितळेची भांडी पारंपरिकरीत्या जपून ठेवली जातात. याच ...
तांबे व पितळच्या भांड्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. ग्रामीण भागात अशी तांब्या, पितळेची भांडी पारंपरिकरीत्या जपून ठेवली जातात. याच पारंपरिक ठेव्यावर अज्ञात महिलांच्या टोळीने आलेगावमध्ये अगदी राजरोसपणे डल्ला मारल्याचे बोलले जाते. या भांड्यांना पुन्हा चमकवणे सहज सोपे नसते. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन ही भांडी चमकावून नवी करून देण्याच्या नावाखाली अज्ञात महिलांनी गावातून भांडी गोळा केली. सोबतच काही कुकरसुद्धा दुरुस्तीसाठी जमा केले. तीन लीटरच्या कुकरला पाच लीटरमध्ये बदलवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. भांडी चमकविण्यासाठी आणि कुकर दुरुस्त करण्यासाठी गावातील महिलांकडून पैसेसुद्धा घेण्यात आले. भांडे आणि पैसे घेऊन गेलेल्या अनोळखी महिला पुन्हा गावात फिरकल्या नाहीत किंवा कोणालाही दिसल्या नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आता गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने या महिलांच्या टोळीचा गावकरी शोध घेत आहेत.
तांब्या-पितळेची भांडी चमकविणे हा आमचा व्यवसाय असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरातील भांडी दिली. पण, त्या महिला परत आल्याच नाहीत.
- ज्योती दत्तात्रय काळदाते
त्या महिलांच्या बोलण्यावरून भांड्यांचा त्यांचा मूळ व्यवसाय असावा असे वाटले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता आमचे भांडेही गेले आणि पैसेही गेले.
- उमाबाई गजानन मुर्तडकर
आलेगावमधून या प्रकारची कोणतीही तक्रार आली नाही, अथवा याबाबत कोणी माहितीही दिली नाही. तरी नागरिकांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून काही देऊ नये व सावध राहावे.
- राहुल वाघ, ठाणेदार, चान्नी पोलीस स्टेशन